शिवसेनेच्या चहापानात मित्रपक्ष भाजप विन्मुख, काँग्रेस नेत्यांची आश्चर्यकारक हजेरी

By Admin | Updated: February 13, 2015 23:11 IST2015-02-13T23:11:15+5:302015-02-13T23:11:15+5:30

Shivsena's Tea Party, a friendly party of Congress leaders | शिवसेनेच्या चहापानात मित्रपक्ष भाजप विन्मुख, काँग्रेस नेत्यांची आश्चर्यकारक हजेरी

शिवसेनेच्या चहापानात मित्रपक्ष भाजप विन्मुख, काँग्रेस नेत्यांची आश्चर्यकारक हजेरी

>

पुणे : शिवसेनेचे कार्यकारी अध्यक्ष उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत झालेल्या चहापान कार्यक्रमात काँग्रेसच्या प्रमुख पदाधिकार्‍यांनी हजेरी लावल्याने उपस्थितांच्या भुवया उंचावल्या. राष्ट्रवादी काँग्रेसच्याही एका नेत्याने हजेरी लावली तरी शिवसेनेचा मित्र पक्ष असलेल्या भाजपच्या एकाही कार्यकर्त्याने या चहापानात मागमूस नव्हता. मनसेही फटकून राहिला.
कर्वेनगरमधील वसुंधरा पंडित फार्ममध्ये शिवसेनेच्या शहर शाखेने हा चहापान कार्यक्रम आयोजित केला होता. ठाकरे यांनी पुण्याने आमचे आमदार निवडून दिले नसले तरी मत आणि मत महत्वाचे आहे. प्रश्न सोडविणे गरजेचे आहे, असे म्हणत दुरावलेल्या मतदारांना चुचकारण्याचा प्रयत्न केला.
या चहापानासाठी दुपारी ४ ते ८ ही वेळ होती. मात्र ठाकरे सायंकाळी सहानंतर कार्यक्रमाच्या ठिकाणी आले. त्यावेळी फटाक्यांचा दणदणाट, घोषणाबाजी केली गेल्याने वातावरण निर्मिती झाली, मात्र फार्ममध्ये भरपूर जागा असल्याने गर्दीचे प्रमाण फारसे दिसत नव्हते.
ठाकरे यांच्या भेटीसाठी विधान परिषदेतील काँग्रेसचे आमदार शरद रणपिसे, शहर काँग्रेसचे अध्यक्ष अभय छाजेड तसेच पालिकेतील विरोधी पक्ष नेते अरविंद शिंदे एकापाठोपाठ दाखल झाले. माजी महापौर आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे उल्हास ढोले पाटील हेही आले. त्यामुळे उपस्थितांमध्ये वेगळ्याच राजकीय संदर्भांची चर्चा दबकेपणे झाली.
जुन्या काळातील अभिनेत्री उषा चव्हाण, महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या कार्याध्यक्ष माधवी वैद्य, तसेच भारत देसरडा, सुनिल महाजन, बांधकाम व्यावसायिक अनिरूद्ध देशपांडे, थीम पार्कचे संकल्पक मनिष साबडे, सुधन्वा रानडे, निवृत्त कर्नल सदानंद साळुंके, संगणकतज्ज्ञ दीपक गुंदेचा, युवा अभिनेता पुष्कर जोग यांच्यासह अनेकांनी ठाकरे यांची भेट घेतली व काही निवेदनेही दिली.
ठाकरे शिवसैनिकांच्या शिस्तबद्धतेविषयी सांगत असतानाच अनेक महिला व पुरूष कार्यकर्ते उषा चव्हाण यांच्यासमवेत मोबाईलवरून छायाचित्रे टिपण्यात मग्न होते. व्यासपीठावर केवळ निमंत्रितांनी यावे, शिवसैनिकांनी नाही, असे माजी शहर प्रमुख श्याम देशपांडे यांनी सांगूनही व्यासपीठावर ठाकरे यांना पुष्पगुच्छ देण्यासाठी गर्दी सुरू होतीच, त्यामुळे देशपांडे यांनी काही वेळ कार्यक्रम थांबविण्याचा इशारा दिला. मिसळ पे चर्चा असे कार्यक्रमाचे स्वरूप असल्याचा उल्लेख ठाकरे यांनी करून मिसळ आणि वडे दिसत नसल्याबद्दल ओझरता उल्लेख केला.
अनेकांची निराशा
रात्री ८ पर्यंत कार्यक्रम असल्याने अनेक अनेकजण येत होते, मात्र ठाकरे सहा ते साडेसात दरम्यान उपस्थित होते. ते कार्यक्रम आटोपून रवाना झाल्याने अनेकांची निराशा झाली. काँग्रेसचे अभय छाजेड यांना शहर प्रमुख विनायक निम्हण यांना पुष्पगुच्छ देऊन समाधान मानावे लागले. महाराष्ट्र केसरी विजय बनकर हेही मिरवणुकीने आले होते, त्यांची भेट होऊ शकली नाही. ग्रामीण भागातून आलेल्या कुलदीप कोंडे यांच्यासारख्या कार्यकर्त्यांचीही निराशाच झाली.

Web Title: Shivsena's Tea Party, a friendly party of Congress leaders

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.