शिवसेनेचे विधानसभेसाठी ‘घर-घर चलो’
By Admin | Updated: July 2, 2014 01:01 IST2014-07-02T00:46:12+5:302014-07-02T01:01:24+5:30
औरंगाबाद : झंझावाती व नियोजनपूर्वक प्रचाराचा लोकसभा निवडणुकीत भाजपाला झालेला फायदा पाहता शिवसेनेने विधानसभेसाठी कंबर कसली आहे.

शिवसेनेचे विधानसभेसाठी ‘घर-घर चलो’
औरंगाबाद : झंझावाती व नियोजनपूर्वक प्रचाराचा लोकसभा निवडणुकीत भाजपाला झालेला फायदा पाहता शिवसेनेने विधानसभेसाठी कंबर कसली आहे. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे राज्याच्या दौऱ्यावर निघालेले असतानाच शिवसेनेच्या जिल्हा शाखेने ‘माझा महाराष्ट्र- भगवा महाराष्ट्र’ या अभियानांतर्गत प्रत्येक घराशी संपर्क साधण्याची मोहीम आखली आहे. येत्या आठवड्यात एका मेळाव्याने या उपक्रमास प्रारंभ होईल.
भाजपाने लोकसभेसाठी ‘हर-हर मोदी- घर-घर मोदी’ची घोषणा देत नागरिकांशी संपर्क साधून त्यांच्याकडून चंदाही जमा केला होता. त्यानिमित्ताने भाजपा कार्यकर्त्यांनी प्रत्येक घराशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला होता. त्याच धर्तीवर शिवसेनेने विधानसभेसाठी ‘माझा महाराष्ट्र’ अभियान सुरू केले आहे. या अभियानांतर्गत जिल्ह्यातील सर्व विधानसभा (भाजपाच्या वाट्याला गेलेल्यांसह) क्षेत्रात कार्यकर्ता मेळावे आयोजित केले आहेत. तसेच येत्या ५ जुलै रोजी शहरात भव्य मेळावा होत असून, त्यात पुढील कार्यक्रमाची घोषणा होणार आहे.
जिल्ह्यातील २,५७० बुथला भेटी देणे, बुथप्रमुखांना प्रशिक्षण, प्रत्येक बुथवरील मतदार संख्येनुसार कार्यकर्त्यांची ‘संपर्क कार्यकर्ता’ म्हणून नेमणूक केली जाणार आहे. याशिवाय मतदार नोंदणी, मतदार याद्यांचे बुथनिहाय वाचन, शिवसेनेचे मतदार व शिवसेनेला अनुकूल असलेल्या मतदारांची ओळख पटवून घेतली जाणार आहे. प्रत्येक घरी जाऊन तेथे शिवसेनेचे स्टीकर डकविले जाणार आहे. शिवसेनेच्या जुन्या व जेष्ठ नेत्यांच्या भेटीगाठी यानिमित्त घेतल्या जाणार आहेत.
विधानसभेच्या व्यूहरचेनेसाठी त्यांच्या सूचनाही घेतल्या जाणार आहेत. प्रत्येक वसाहतीमध्ये शिवसेनेची शाखा सुरू केली जाणार आहे. विशेष म्हणजे मेळाव्यानंतर पुढील आठवड्याचे हे नियोजन आहे. त्यानंतर पुढचा कार्यक्रम दिला जाणार आहे. शिवसेनेच्या सर्व विंगला स्वतंत्र जबाबदारी दिली जाणार आहे.
यानिमित्त नेते उद्धव ठाकरे व सुभाष देसाई यांच्या दौऱ्याचे नियोजन सुरू आहे. त्यांच्यासह अन्य मान्यवरही जाणीवजागृती मोहिमेत सहभागी होणार आहेत, अशी माहिती जिल्हाप्रमुख अंबादास दानवे यांनी दिली.
शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी घालून दिलेला पक्षसंघटनात्मक बांधणीचा पॅटर्न आम्ही राबवीत आहोत. हे कुणाचेही अनुकरण नाही. आमचेच अनुकरण सर्व पक्ष करतात, असेही दानवे यांनी सांगितले.
इच्छुकांना मुंबईचे बोलावणे
महाराष्ट्रात मोठा भाऊ कोण? यावरून युतीत धुसफूस सुरू झालेली आहे. लोकसभेत मिळालेल्या यशाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रात पाय रोवण्याची ही सुवर्णसंधी असल्याचे भाजपाच्या वरिष्ठ नेत्यांना वाटत आहे.
त्याचमुळे भाजपा ‘शतप्रतिशत’च्या भूमिकेवर ठाम आहे. त्यामुळे भाजपाने स्वतंत्र लढायचा निर्णय घेतल्यास अडचण नको म्हणून शिवसेनेनेही योजना आखली आहे.
विश्वसनीय सूत्रांनी सांगितले की, गेल्या आठवड्यात उद्धव ठाकरे यांनी फक्त जिल्हाध्यक्षांची मुंबईत बैठक बोलावली होती. त्यात भाजपाच्या वाट्याला सुटलेल्या जागांवर शिवसेनेच्या ताकदीचा आढावा घेण्यात आला व निवडणूक लढवू इच्छिणाऱ्यांची नावेही जाणून घेतली होती. त्यावरून मराठवाड्यात भाजपाला सुटलेल्या जागांवरून लढू इच्छिणाऱ्या उमेदवारांना मंगळवारी (दि.१) मुंबईला बोलावण्यात आले होते. त्यांच्या तयारीबाबत पक्षश्रेष्ठी जाणून घेणार आहेत.