मध्य प्रदेशातील शिवपुरी जिल्ह्यातील सिरसौद पोलीस ठाण्यांतर्गत येणाऱ्या टोगरा गावातील पेट्रोल पंपाजवळ आज एक अत्यंत भीषण अपघात झाला. या अपघातात नवविवाहित जोडप्यासह कुटुंबातील चार सदस्यांचा मृत्यू झाला आहे. लग्न आटोपून आनंदाने आपल्या घरी परतणाऱ्या या कुटुंबावर रस्त्यातच काळाने घाला घातला. नवरा-नवरी रिक्षातून आपल्या घरी जात होते, याच दरम्यान अचानक रिक्षावर ट्रक उलटला.
मिळालेल्या माहितीनुसार, शिवपुरी येथे रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या रिक्षावर ट्रक उलटला. ही धक्कादायक घटना शनिवारी दुपारी १२ वाजताच्या सुमारास सिरसौद पोलीस ठाण्याच्या हद्दीतील टोंगरा रोडवरील पेट्रोल पंपाजवळ घडली. पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला असून जखमींवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. नवरा-नवरीसह नातेवाईकांचा मृत्यू झाल्याने कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे.
लग्न सोहळा पार पडला अन्...
राजगड गावातील रहिवासी २५ वर्षीय विरेंद्र शाक्य याचं लग्न शिवपुरीच्या संजय कॉलनीतील राजेश्वरी शाक्य हिच्याशी झालं होतं. संजय कॉलनीतील एका मंदिरात कुटुंबीयांच्या उपस्थितीत हा लग्न सोहळा पार पडला. शनिवारी लग्नानंतर नवरदेव-नवरी, विरेंद्रची आई अन्वेश शाक्य (५०), वहिनी राजो शाक्य (२२) आणि बहीण भुरिया शाक्य (१९) हे सर्वजण रिक्षामधून राजगड गावाकडे निघाले होते. टोंगरा रोडवरील पेट्रोल पंपाजवळ चालकाने रिक्षा थांबवली होती.
ट्रक थेट रिक्षावरच उलटला
रिक्षा थांबलेली असताना चालक आणि नवरदेवाची बहीण जवळच असलेल्या एका दुकानात गेले होते. त्याचवेळी एक अनियंत्रित ट्रक थेट रिक्षावरच उलटला. रिक्षात बसलेले नवरदेव-नवरी, नवरदेवाची आई आणि वहिनी ट्रकखाली दबले गेले. त्यांचा जागीच मृत्यू झाला. या घटनेनंतर परिसरात एकच खळबळ माजली. घटनेची माहिती मिळताच पोलीस आणि प्रशासनाने घटनास्थळी धाव घेतली. जेसीबीच्या साहाय्याने ट्रक बाजूला करून मृतदेह बाहेर काढावे लागले. या घटनेमुळे संपूर्ण गावावर शोककळा पसरली आहे.
Web Summary : A tragic accident in Madhya Pradesh claimed four lives, including a newly married couple. A truck overturned on their auto-rickshaw shortly after their wedding ceremony as they were returning home. The accident occurred near a petrol pump in Shivpuri district, plunging the family into mourning.
Web Summary : मध्य प्रदेश में एक दुखद हादसे में नवविवाहित जोड़े सहित चार लोगों की जान चली गई। शादी के तुरंत बाद घर लौटते समय शिवपुरी जिले में एक ट्रक उनके ऑटो-रिक्शा पर पलट गया। इस घटना से परिवार में मातम छा गया है।