नांदेडच्या शिवाजी पाटलांची कमाल; सायकलवरुन भारत दर्शन, आतापर्यंत केला 12 हजार किमीचा प्रवास
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 22, 2022 17:46 IST2022-05-22T17:46:32+5:302022-05-22T17:46:41+5:30
नांदेडचे शिवाजी पाटील सायकलवरुन भारत भ्रमंतीवर निघाले आहेत. सध्या ते केदारनाथ येथे असून, सायकल हातात घेऊन कठीण चडाई करत आहेत.

नांदेडच्या शिवाजी पाटलांची कमाल; सायकलवरुन भारत दर्शन, आतापर्यंत केला 12 हजार किमीचा प्रवास
Uttarakhand News: जगभरात सायकलने फिरणाऱ्यांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. अनेकांना दूर-दूरपर्यंत सायकलवरुन फिरायची आवड असते. अशाच प्रकारची आवड असलेला व्यक्ती सायकलवरुन भारत दर्शनाला निघाला आहे. सध्या हा व्यक्ती उत्तराखंडमध्ये असून, तो त्याची सायकल घेऊन केदारनाथची चढाई करतोय.
केदारनाथमध्ये सायकल घेऊन चढाई
सायकलवरुन भारत भ्रमण करणाऱ्या व्यक्तीचे नाव शिवाजी पाटील असून, ते नांदेड येथील रहिवासी आहेत. शिवाजी पाटील यांना सायकलवरुन फिरण्यची प्रचंड आवड आहे. ही आवड जोपासण्यासाठीच ते सायकलवरुन भारतातील विविध राज्यात जात असून, तेथील लोकांना भेटणे आणि त्यांची संस्कृती जाणून घेण्याचे काम ते करत आहेत. भारत दर्शनाला निघालेले शिवाजी पाटील सध्या ते केदारनाथ इथे आहेत. जिथे, साधं चालूनही माणसाला प्रचंड थकवा येतो, तिथे शिवाजी पाटील सायकल घेऊन चढाई करत आहेत.
देशाचा अमृत महोत्सव साजरा करण्यासाठी प्रवास
गौरीकुंड ते केदारनाथ हे अंतर सुमारे 19 किमी असून रामबारा येथून खडी चढाईमुळे भाविकांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागते. शिवाजी पाटील सायकल घेऊन बाबा केदारनाथची यात्रा करत आहे. याबाबत शिवाजी पाटील यांनी सांगितले की, देशाला स्वातंत्र्य मिळून 75 वर्षे झाली आहेत. या पार्श्वभूमीवर ते देशाच्या विविध राज्यात फिरुन स्वातंत्र्याचा अमृतोत्सव साजरा करत आहेत. गेल्या महिनाभरापासून ते उत्तराखंडच्या दौऱ्यावर आहेत.
सध्या चारधाम यात्रेवर
आजकाल शिवाजी पाटील चारधाम यात्रेवर आहेत. देशातील प्रत्येक राज्याची संस्कृती जाणून घेणे हा त्यांचा उद्देश असल्याचे त्यांनी सांगितले. तिथल्या वेगवेगळ्या ठिकाणांची माहिती घेणे, लोकांना भेटणे हे त्यांचे नित्य काम झाले आहे. शिवाजी पाटलांनी आतापर्यंत महाराष्ट्र, गोवा, गुजरात, दिल्ली, मध्य प्रदेश आणि हरियाणाला भेट दिली आहे.
12 हजार किलोमीटरचा प्रवास
शिवाजी पाटील यांनी सांगितले की, त्यांनी सहा महिन्यांत 12 हजार किलोमीटर सायकल चालवली आहे आणि चार धाममधील केदारनाथ, बद्रीनाथ, यमुनोत्री आणि गंगोत्रीला भेट दिल्यानंतर ते हिमाचलच्या दौऱ्यावर जाणार आहेत. दीड महिना हिमालाच प्रवास केल्यानंतर ते लडाख, काश्मीर, पंजाब, राजस्थान, यूपी आणि बिहारला भेट देणार आहेत. 20 महिन्यांच्या प्रवासात जास्तीत जास्त किलोमीटरचा प्रवास करणार असल्याचे त्यांनी सांगितले.