मुसलमानाने बांधले शिवमंदिर
By Admin | Updated: March 9, 2015 16:02 IST2015-03-09T15:37:47+5:302015-03-09T16:02:38+5:30
उत्तरप्रदेशमधील मथुरा येथे राहणा-या एका मुसलमानाने हिंदूंसाठी शिवमंदिर बांधून हिंदू - मुस्लीम एकतेचा संदेश दिला आहे.

मुसलमानाने बांधले शिवमंदिर
>ऑनलाइन लोकमत
मथुरा, दि. ९ - उत्तरप्रदेशमधील मथुरा येथे राहणा-या एका मुसलमानाने हिंदूंसाठी शिवमंदिर बांधून हिंदू - मुस्लीम एकतेचा संदेश दिला आहे. देव हा एकच असून त्याला शोधण्याचे मार्ग वेगवेगळे असू शकतात असे मंदिर बांधणा-या मुसलमानाचे म्हणणे आहे.
मथुरा येथे राहणारे अजमल अली शेख हे गावाचे सरपंच आहेत. गेल्या वर्षी महाशिवरात्रीला गावातील हिंदू महिला पुजेसाठी चार किलोमीटर लांब असलेल्या मंदिरात चालत जाताना शेख यांनी बघितले. पुजेसाठीदेखील महिलांना ऐवढ्या लांब जावे लागते हे बघून शेख अस्वस्थ झाले. त्यांनी स्वतःच गावात हिंदूंसाठी मंदिर बांधण्याचा निर्णय घेतला. आठ महिन्यांची मेहनत व तब्बल साडे चार लाख रुपये खर्च करुन शेख यांनी गावातील हिंदूंसाठी मंदिर बांधले. या मंदिरामध्ये शंकर आणि हनुमान मुर्तीची प्रतिष्ठापना करण्यात आली आहे. आज देशभरात हिंदू - मुस्लीमांमध्ये एकोपा निर्माण करण्याची गरज आहे असे शेखर आवर्जून नमुद करतात. येत्या काही दिवसांमध्ये मंदिराच्या बाजूला पुजारी आणि लांबून येणा-या भक्तांसाठी काही खोल्या बांधू असे शेख यांनी सांगितले. मंदिराच्या प्राणप्रतिष्ठापना सोहळ्यात शेख हे स्वतः हवन करण्यासाठी बसले होते. मथुरा हे हिंदू - मुस्लीम एकतेचे प्रतिक असून आमच्या गावात हिंदू व मुस्लीम एका कुटुंबाप्रमाणेच राहतात असे शेख यांनी म्हटले आहे.