शिवसेना मंत्र्यांनी प्रचार केलेल्या भाजपा उमेदवाराचा 1 लाख मताधिक्क्याने विजय, शिवसेनेच्या उमेदवाराला फक्त 1104 मतं
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 18, 2017 17:13 IST2017-12-18T17:04:49+5:302017-12-18T17:13:22+5:30
सूरतच्या चोरयासी विधानसभा मतदारसंघातून भाजपा उमेदवार झंखाना पटेल या 1 लाखापेक्षा जास्त मताधिक्क्यांनी विजयी झाल्या आहेत.

शिवसेना मंत्र्यांनी प्रचार केलेल्या भाजपा उमेदवाराचा 1 लाख मताधिक्क्याने विजय, शिवसेनेच्या उमेदवाराला फक्त 1104 मतं
सूरत - सूरतच्या चोरयासी विधानसभा मतदारसंघातून भाजपा उमेदवार झंखाना पटेल या 1 लाखापेक्षा जास्त मताधिक्क्यांनी विजयी झाल्या आहेत. शिवसेनेचे राज्यातील मंत्री विजय शिवतारे सूरतमध्ये झंखाना पटेल यांच्या प्रचारासाठी गेल्याने राजकीय वर्तुळात अनेकांच्या भुवया उंचावल्या होत्या. झंखाना यांना 1 लाख 73 882 मते मिळाली त्यांनी काँग्रेसच्या योगेश भगवान पटेल यांचा पराभव केला. योगेश पटेल यांना 63 हजार 63 मते मिळाली.
चोरयासीमधून शिवसेनेचे उमेदवार अरविंद उत्तमसिंह राजपूतही निवडणूक लढवत होते. त्यांना फक्त 1104 मते मिळाली. शिवसेनेने भाजपाला धक्का देण्यासाठी गुजरातमध्ये उमेदवार उभे केले होते. पण शिवसेनेचे राज्यातील मंत्रीच सूरतमध्ये जाऊन भाजपा उमेदवाराचा प्रचार करत असल्याचे वृत्त आल्यानंतर शिवसेनेत अस्वस्थतता निर्माण झाली होती. शिवसेनेचे पुरंदर येथील आमदार विजय शिवतारे 22 नोव्हेंबरला सूरतच्या चोरयासी विधानसभा मतदारसंघात भाजपा उमेदवार झंखाना पटेलच्या प्रचारासाठी गेले होते.
झंखाना भाजपाचे दिवंगत आमदार राजा पटेल यांची मुलगी आहे. झंखानाच्या प्रचारासाठी आयोजित करण्यात आलेल्या सभेमध्ये मुंबई भाजपा अध्यक्ष आशिष शेलारही उपस्थित होते. विजय शिवतारे राज्याचे जलसंवर्धन राज्यमंत्री आहेत. चोरयासी मतदारसंघ भाजपाचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जातो. 2015 साली चोरयासीचे स्थानिक आमदार राजा पटेल याचे डेंग्युने निधन झाले. त्यानंतर इथे झालेल्या पोटनिवडणुकीत भाजपाने झंखाना पटेल यांना उमेदवारी दिली. झंखानानेही विजय मिळवून जागा कायम राखली होती.
देशात अन्य कुठल्याही शहराचा सूरत इतका वेगाने विकास झालेला नाही असे शिवतारे सभेमध्ये म्हणाले होते. मी माझ्या पक्षाच्यावतीने इथे आलेलो नाही. मी माझ्या कुटुंबासाठी आलोय. राजाभाई पटेल माझे जवळचे मित्र होते. मुंबईत काहीकाळ आम्ही दोघांनी एकत्र घालवला. राजाभाई आणि मी एकाचवेळेस राजकारणात प्रवेश केला. त्यांनी जमलेल्या नागरिकांना झखांना पटेलला मतदान करण्याचे आवाहन केले होते. शिवसेनेने गुजरातमध्ये 47 उमेदवार उभे केले होते.