सीमा हैदर अन् शेख हसीनाला परत पाठवा; त्या भारतीयांची अवस्था पाहून शिवसेनेचा संताप
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 7, 2025 15:50 IST2025-02-07T15:50:08+5:302025-02-07T15:50:55+5:30
Illegal Immigration: अमेरिका अवैध स्थलांतरितांवर कारवाई करू शकते, तर भारतानेही करावी, अशी मागणी शिवसेनेने केली.

सीमा हैदर अन् शेख हसीनाला परत पाठवा; त्या भारतीयांची अवस्था पाहून शिवसेनेचा संताप
Shiv Sena Protest: अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या आदेशानंतर अवैध भारतीय स्थलांतरितांना युएस लष्कराच्या विमानाने मायदेशात पाठवण्यात आले. या सर्व भारतीयांच्या हात आणि पायात बेड्या घालण्यात आल्या होत्या. याचे फोटो अन् व्हिडिओ सर्वत्र व्हायरल होत आहेत. याविरोधात पद्धतीवर आज जम्मूतील शिवसेना कार्यकर्त्यांनी तीव्र निदर्शने केली. यासोबतच भारतानेही बेकायदेशीरपणे वास्तव्यास असलेल्या रोहिंग्या निर्वासितांना लवकरात लवकर देशाबाहेर काढावे, अशी मागणीही केली.
जम्मूमध्ये केंद्र सरकारच्या विरोधात निदर्शने करणाऱ्या शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी 'सीमा हैदरला परत पाठवा', 'शेख हसीनाला परत पाठवा' आणि 'रोहिंग्यांना परत पाठवा' अशा घोषणा दिल्या. ज्याप्रमाणे अमेरिकेने स्थलांतरितांविरोधात कठोर भूमिका घेतली आहे, त्याचप्रमाणे भारतानेही बेकायदेशीर भारतात राहणाऱ्या स्थलांतरितांवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी जम्मू शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी केली.
बांग्लादेशी घुसखोरीने चिंता
जम्मू-काश्मीर शिवसेनेचे अध्यक्ष मनीष साहनी म्हणाले की, 2007 मध्ये प्रसिद्ध झालेल्या अहवालानुसार सुमारे 1.25 कोटी बांगलादेशी भारतात बेकायदेशीरपणे राहत होते आणि दरवर्षी तीन लाख नवीन बांगलादेशी घुसखोरी करतात. सध्या भारतात बेकायदेशीर बांगलादेशींची संख्या सुमारे दोन कोटींवर पोहोचली असल्याचा दावा त्यांनी केला.
भाजपवरही निशाणा साधला
शिवसेनेने भाजप सरकारवरही निशाणा साधला. बेकायदेशीर स्थलांतरितांना बाहेर पाठवण्याची आश्वासने निवडणुकीत दिली जातात, मात्र आजतागायत ठोस पावले उचलली गेली नाहीत. बांग्लादेशला लागून असलेल्या 856 किमी लांबीच्या सीमेला अद्याप पूर्णपणे कुंपण घालण्यात आलेले नाही, त्यामुळे घुसखोरी सुरू असल्याचा आरोप त्यांनी केला.
जम्मू-काश्मीरमध्ये राहणाऱ्या रोहिंग्या निर्वासितांची कोणतीही अधिकृत नोंद नाही, ज्यामुळे सुरक्षेला धोका निर्माण होऊ शकतो, असेही शिवसेना कार्यकर्त्यांनी म्हटले. जर अमेरिका अवैध स्थलांतरितांवर कारवाई करू शकत असेल तर भारतानेही त्याच दिशेने पावले उचलली पाहिजेत, अशी शिवसेनेनं मागणी केली.