यात कसलं आलंय डोंबलाचं राजकारण!; साधुंच्या हत्येवरून शिवसेनेचं योगींना प्रत्युत्तर

By ऑनलाइन लोकमत | Published: April 30, 2020 08:14 AM2020-04-30T08:14:16+5:302020-04-30T08:21:35+5:30

पालघर आणि बुलंदशहरमध्ये साधुंच्या हत्या; शिवसेना आणि योगींमध्ये वाकयुद्ध

shiv sena hits back at up cm uttar pradesh yogi adityanath and bjp over palghar and bulandshahar saint killing kkg | यात कसलं आलंय डोंबलाचं राजकारण!; साधुंच्या हत्येवरून शिवसेनेचं योगींना प्रत्युत्तर

यात कसलं आलंय डोंबलाचं राजकारण!; साधुंच्या हत्येवरून शिवसेनेचं योगींना प्रत्युत्तर

Next

मुंबई: पालघर साधू हत्येचे आरोपी पकडले गेले तसे उत्तर प्रदेशातील बुलंदशहरात झालेल्या साधू हत्याकांडाचे आरोपीदेखील अटकेत गेले. कारण दोन्ही राज्ये कायद्याची आहेत. फरक इतकाच की, महाराष्ट्रात विरोधी पक्ष जसा थयथयाट करीत आहे तसे चित्र योगी महाराजांच्या राज्यात दिसत नाही, अशा शब्दांत शिवसेनेनं उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथांना प्रत्युत्तर देत राज्यातील भाजपा नेत्यांवर निशाणा साधला आहे. साधुंच्या मारेकऱ्यांवर कारवाई करा हे सांगण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी योगींना फोन केला. यात कसलं आलंय डोंबलाचं राजकारण, असं शिवसेनेनं 'सामना'च्या अग्रलेखात म्हटलं आहे.

महाराष्ट्र आणि उत्तर प्रदेशातल्या विरोधी पक्षाच्या वर्तनावर बोट ठेवत शिवसेनेनं राज्य भाजपाला लक्ष्य केलं. 'राजकारणातील मानवी मनाचे हे नवे कंगोरे गमतीचे तितकेच गुंतागुंतीचेही आहेत. जनता गंमत बघत आहे. महाराष्ट्रात विरोधी पक्ष गुंत्यात पाय अडकवून स्वत:चेच हसे करून घेत आहे. उत्तर प्रदेशची जनता या खेळास मुकली आहे. बाकी योगी महाराजांचे बरे चालले आहे,' अशा शब्दांत शिवसेनेनं भाजपाचा समाचार घेतला आहे.

'महाराष्ट्रात उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाल्यापासून विझलेल्या कोळशावरील राखुंडी सैरभैर उडावी तसे काही लोकांचे झाले आहे खरे! उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ एक साधू आहेत. त्यांच्या साधुत्वाचा आम्ही नेहमीच आदर केला. महाराष्ट्रात मध्यंतरी दोन साधूंची हत्या जमावाने केली ही अत्यंत दु:खद आणि चीड आणणारी बाब आहे. ज्या गावात ही हत्या झाली ते संपूर्ण गाव भारतीय जनता पक्षाच्या राजकीय अधिपत्याखाली बऱयाच वर्षांपासून आहे, पण अशा प्रसंगात राजकारण नको असे मुख्यमंत्री ठाकरे यांनी ठणकावून सांगितले व 72 तासांत शंभरांवर आरोपींना बेड्या ठोकल्या. या प्रसंगावर योगी आदित्यनाथ यांनी मुख्यमंत्री ठाकरे यांना फोन करून चिंता व्यक्त केली होती. भगव्या वस्त्रातील साधूंची हत्या होणे ठीक नाही, ही त्यांची चिंता समजण्यासारखी आहे. साधूंचे मन साधूच जाणतो हे खरे, पण पुढच्या दहा दिवसांतच योगी महाराजांच्या राज्यातच बुलंदशहरमधील देवळातच दोन साधू महाराजांची हत्या झाली. महाराष्ट्रातील साधूंचा मृत्यू जमावाच्या मारहाणीत झाला, तर योगांच्या राज्यात साधूंना गळे चिरून मारले. या साधूंच्या हत्येवर मुख्यमंत्री ठाकरे यांनी योगी महाराजांना फोन केला व चिंता व्यक्त केली. असे प्रसंग राजकारण करण्याचे नसून गुन्हेगारांना एकत्रित येऊन धडा शिकविण्याचे आहेत. आम्ही तुमच्यासोबतच आहोत, गुन्हेगारांना कठोर शासन तुम्ही करालच, असे महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी उत्तर प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांना एका कळकळीने सांगितले. संपूर्ण महाराष्ट्राची हीच भावना आहे. यात कसले आलेय डोंबलाचे राजकारण', अशा शब्दांत शिवसेनेनं बुलंदशहरमधील साधुंच्या हत्येवर भाष्य केलं.

'मुख्यमंत्री ठाकरे यांनी योगी महाराजांना फोन करून चिंता व्यक्त केली यातही काही लोकांना फक्त राजकारणाचाच वास येत आहे व त्यांनी असे सांगितले की, बुलंदशहरातील घटना वेगळी व महाराष्ट्रातील वेगळी, तुम्ही तुमचा महाराष्ट्र सांभाळा वगैरे विधाने योगी महाराजांच्या कार्यालयातून केल्याचे स्पष्ट दिसत आहे. म्हणजे महाराष्ट्रात एखादी दुर्घटना घडली की, चिंतेचा माहोल निर्माण केला जातो किंवा कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न उभा केला जातो, पण भाजपशासित राज्यात भगवी वस्त्र रक्ताने लथपथ झाली तरी चिंतेची शिंकही कुणी मारायची नाही. भगव्या-भगव्यात व रक्ता-रक्तात फरक करणारे हे मानवी मन गमतीचेच आहे, असे आम्ही म्हणतो ते यासाठीच. बुलंदशहरात जे घडले, त्याआधी दोनेक दिवस इटावा येथे एका ब्राह्मण कुटुंबात पाच जणांची हत्या झाली व त्यातील काहीजण धार्मिक विधी, पूजाअर्चा करून उदरनिर्वाह करणारे होते. म्हणजे तेही एकप्रकारे गरीब साधूच होते, पण बुलंदशहर ते इटावापर्यंत हत्या होऊनही कोणी तेथील मुख्यमंत्र्यांचा राजीनामा मागितला नाही. राज्यपालांच्या घरात बसून अखंड ठिय्या मांडला नाही. शहरी नक्षलवाद्यांचा हा सर्व हैदोस असून सर्व प्रकरणाचा तपास सीबीआय किंवा इंटरपोलकडे द्यावा, अशी मागणी केली नाही. दिल्लीतून खास हालचाली झाल्या व साधू हत्येबाबत माहिती मागवून राष्ट्रीय गृहमंत्र्यांनी चिंता व्यक्त केली, अशी बातमी आमच्या वाचनात आली नाही,' असं शिवसेनेनं म्हटलं आहे.

मोदी यांच्याशी चर्चेनंतर उद्धव यांचा आमदार होण्याचा मार्ग मोकळा?

स्थलांतरित मजूर, विद्यार्थी, भाविक यांना आपापल्या गावी जाण्यास केंद्राची सशर्त मंजुरी

Web Title: shiv sena hits back at up cm uttar pradesh yogi adityanath and bjp over palghar and bulandshahar saint killing kkg

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.