मोदी यांच्याशी चर्चेनंतर उद्धव यांचा आमदार होण्याचा मार्ग मोकळा?

By ऑनलाइन लोकमत | Published: April 30, 2020 06:25 AM2020-04-30T06:25:33+5:302020-04-30T06:26:39+5:30

ठाकरे यांच्या विधान परिषदेवरील नियुक्तीवरून सध्या जे राजकारण सुरू आहे, त्याविषयी ठाकरे यांनी पंतप्रधानांकडे नाराजी व्यक्त केल्याचे समजते.

After talks with Modi, Uddhav's way to become MLA is clear? | मोदी यांच्याशी चर्चेनंतर उद्धव यांचा आमदार होण्याचा मार्ग मोकळा?

मोदी यांच्याशी चर्चेनंतर उद्धव यांचा आमदार होण्याचा मार्ग मोकळा?

Next

मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मंगळवारी रात्री पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी दूरध्वनीवरून संवाद साधल्याची माहिती आहे. मिळालेल्या माहितीनुसार, ठाकरे यांच्या विधान परिषदेवरील नियुक्तीवरून सध्या जे राजकारण सुरू आहे, त्याविषयी ठाकरे यांनी पंतप्रधानांकडे नाराजी व्यक्त केल्याचे समजते. मुख्यमंत्री ठाकरे यांची विधान परिषदेवर राज्यपाल नियुक्त सदस्य म्हणून नियुक्ती करावी, अशी शिफारस राज्य मंत्रिमंडळाने दोनवेळा केली. मात्र, राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी त्यावर अद्याप निर्णय घेतलेला नाही. ठाकरे यांच्या नियुक्तीबाबत तत्काळ निर्णय घ्या, असे पत्र राज्यातील आठ पक्षांच्या नेत्यांनी बुधवारी राज्यपालांना पाठविले आहे.

राजभवनावरून सकारात्मक प्रतिसाद मिळत नसल्याने शेवटी ठाकरे यांनी थेट पंतप्रधानांशी संपर्क साधला. याबाबत भाजप अथवा शिवसेनेकडून अधिकृतपणे दुजोरा मिळाला नसला तरी, मिळालेल्या माहितीनुसार, आम्ही मंत्रिमंडळातील सर्व सदस्य केंद्र सरकारच्या खांद्याला खांदा लावून कोरोनाविरुद्धच्या लढ्यात सहभागी आहोत. राज्य अत्यंत अडचणीतून जात आहे. रुग्णांची संख्या तात्काळ कमी करण्याचे मोठे आव्हान सरकारपुढे आहे. अशावेळी विधानपरिषदेच्या जाहीर झालेल्या निवडणुका केंद्रीय निवडणूक आयोगाने पुढे ढकलल्या, त्यामुळे राज्यात राजकीय पेच निर्माण होऊ नये म्हणून आपल्या नावाची शिफारस राज्यपालांकडे मंत्रिमंडळाने केली. मात्र त्यावरून ज्या पद्धतीचे राजकारण सुरू आहे ते राज्यातील प्रशासनाला आणि काम करणाऱ्या प्रत्येकाला नाउमेद करणारे आहे. ही वेळ राजकारण करण्याची नाही तर राजकीय मतभेद बाजूला ठेवून लोकांच्या मदतीसाठी धावून जाण्याची आहे, मात्र दुर्दैवाने जी परिस्थिती महाराष्ट्रात दिसत आहे त्यावरून आपल्याला चिंंता वाटत असल्याचे ठाकरे यांनी पंतप्रधानांना सांगितल्याचे समजते.

याविषयी शिवसेनेचे नेते आणि परिवहन मंत्री अनिल परब यांना विचारले असता ते म्हणाले, मुख्यमंत्री आणि पंतप्रधान यांच्यात कोरोना त्याविरुद्ध लढा देण्यासाठी सातत्याने चर्चा होत आहे. चारवेळा दोघांमध्ये व्हिडिओ कॉन्फरन्सही झाली. तसेच गृहमंत्री अमित शहा हे देखील ठाकरे यांच्याशी फोनवर बोलले आहेत. त्यामुळे त्याचा लगेच असा अर्थ काढणे योग्य होईल असे वाटत नाही. बोलणे झाले की नाही हे ते दोघेच सांगू शकतील असे परब यांनी स्पष्ट केले.

Web Title: After talks with Modi, Uddhav's way to become MLA is clear?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.