शिंगवेला बिबट्याच्या हल्ल्यात बालिका ठार
By Admin | Updated: August 11, 2015 23:16 IST2015-08-11T23:16:05+5:302015-08-11T23:16:05+5:30
दहशत : तीन दिवसांत दुसरा बळी; भरदिवसा बिबट्यांचा मुक्त संचार

शिंगवेला बिबट्याच्या हल्ल्यात बालिका ठार
द शत : तीन दिवसांत दुसरा बळी; भरदिवसा बिबट्यांचा मुक्त संचार नाशिक : निफाड तालुक्यातील सायखेड्यापासून नांदूरमधमेश्वरपर्यंत बिबट्याच्या मुक्त संचाराने रहिवाशांमध्ये दहशत पसरली आहे. बिबट्याच्या हल्ल्यात करंजगाव-शिंगवे शिवारातील शाळकरी मुलीचा बळी गेल्याची घटना आज मंगळवारी (दि.११) संध्याकाळी सहा वाजेच्या सुमारास घडली. तीन दिवसांपूर्वीच याच भागातील चापडगाव येथील एका शाळकरी मुलाचा बिबट्याच्या हल्ल्यात मृत्यू झाला होता. यामुळे वनविभागाच्या पिंजर्यांवरही प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे.निफाड तालुक्यातीन नाशिक पूर्व वनविभागाच्या नियंत्रणाखाली असलेल्या शिंगवे शिवारात संध्याकाळी ६ वाजेच्या सुमारास ओट्यावर हात धुण्यासाठी दीपाली ऊर्फ परी बाळकृष्ण कोटे (६) आली असता बिबट्याने तिच्यावर अचानक झडप घातली. परीच्या मानेला धरून फरफटत अवघ्या शंभर मीटर अंतरावर असलेल्या उसाच्या शेतामध्ये बिबट्या घुसला. दरम्यान, तिच्या आजीने हा थरार बघितल्यानंतर सर्वत्र आरडाओरड सुरू केली त्याचदरम्यान, दुसर्या लहान बिबट्यानेही दर्शन दिल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले. उसाच्या शेतात परीचा शोध घेण्यासाठी सुनीता राजोळे, चंद्रकांत डेर्ले, प्रकाश खालकर, बाळासाहेब खालकर यांनी धाव घेत शेत पिंजून काढले. यावेळी जखमी अवस्थेत ती आढळून आली. त्यांनी तत्काळ तिला उचलून बाहेर आणले व चांदोरी ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी हलविले. तेथून पुढील उपचारासाठी तत्काळ रुग्णवाहिकेतून नाशिकच्या जिल्हा रुग्णालयात हलविले. उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाल्याचे सूत्रांनी सांगितले.शिंगवे शिवारातील माणिक मोगल या शेतक र्याकडे परीचे आजी-आजोबा मोलमजुरी करतात. काही दिवसांपूर्वीच ती त्यांच्याकडे राहायला आली होती. तिचे आई-वडील ओझरनजीकच्या जिभाळा गावात वास्तव्यास आहे. तीन दिवसांपूर्वीच चापडगाव येथे दुपारी साडेचार वाजेच्या सुमारास बिबट्याने गोकुळ ऊर्फ विकी शांताराम पिठे (१०) या शाळकरी मुलावर हल्ला केला होता. या हल्ल्यात विकीचाही मृत्यू झाला होता. कोट..........बिबट्याच्या हल्ल्यात तीन दिवसांमध्ये दोन शाळकरी मुलांना जीव गमवावा लागल्याची दुर्दैवी घटना घडल्या आहेत. वनविभागाकडून सायखेडा, करंजगाव, शिंगवे, चापडगाव, मांजरगाव आदि भागांत बिबट्यांना जेरबंद करण्यासाठी पिंजरे लावले आहेत. मयत व्यक्तीच्या वारसाला वनविभागाकडून शासननियमानुसार आठ लाख रुपयांपर्यंत आर्थिक मदत देण्यात येईल. मी तत्काळ या भागाला भेट देऊन योग्य त्या उपाययोजना करण्यासाठी लक्ष देणार आहे.- रामानुजम आर. एम., उपवनसंरक्षक, वनविभाग पूर्व, नाशिक.