चंद्रशेखर बर्वे -
नवी दिल्ली : उपराष्ट्रपतीपदाची निवडणूनक आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचे वारे वाहू लागले असताना महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री तथा शिंदेसेनेचे प्रमुख एकनाथ शिंदे आणि उद्धवसेनेचे प्रमुख उद्धव ठाकरे दिल्लीत आल्याने देशाच्या राजधानीत आणि महाराष्ट्रात चर्चांना उधाण आले होते. दोन्ही नेते दिल्लीत तीन दिवस तळ ठोकून बसणार आहेत.
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बुधवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची लोककल्याण मार्गावरील निवासस्थानी सहकुटुंब भेट घेतली. तत्पूर्वी, शिंदे यांनी शिवसेनेच्या खासदारांसह गृहमंत्री अमित शाह यांची संसदेतील कार्यालयात भेट घेतली. पंतप्रधान आणि गृहमंत्री यांच्यासोबत अर्ध्या तासापेक्षा जास्त वेळ बंदद्वार चर्चा झाली. यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. शिंदे मंगळवारी रात्री दिल्लीत आले असून, गुरुवारी दुपारपर्यंत दिल्लीत थांबणार आहेत.
रालोआच्या उमेदवाराला पाठिंबा : शिंदेउपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसह खासदारांच्या समस्यांच्या मुद्यांवर गृहमंत्री अमित शाह यांच्यासोबत चर्चा झाली. शिवसेनेने उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत रालोआच्या उमेदवाराला पाठिंबा दिला आहे. मागच्या आठवड्यात गृहमंत्र्यांची भेट झाली नव्हती. यामुळे आज त्यांची सदिच्छा भेट घेतली.
तीन दिवसांचा दौरा, राहुल गांधींकडे स्नेहभोजनउद्धव ठाकरे दिल्ली दौऱ्यावर पोहोचले आहेत. त्यांनी शरद पवारांच्या निवासस्थानी भेट घेतली. ठाकरेंचा हा दौरा तीन दिवसांचा आहे. आदित्य ठाकरे, संजय राऊत, शरद पवार, सुप्रिया सुळे, उद्धव ठाकरे हे सर्वजण उद्या इंडिया आघाडीच्या बैठकीला उपस्थित राहणार आहेत. या दौऱ्यामध्ये उद्धव ठाकरे राहुल गांधी यांच्या निवासस्थानी स्नेहभोजनाला उपस्थित राहणार आहेत.