हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 22, 2025 17:49 IST2025-12-22T17:48:43+5:302025-12-22T17:49:58+5:30
हिमाचल प्रदेशमधील सर्वात मोठ्या रुग्णालयात रुग्ण आणि डॉक्टर यांच्यात जोरदार हाणामारी झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.

हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
हिमाचल प्रदेशमधील सर्वात मोठ्या रुग्णालयात रुग्ण आणि डॉक्टर यांच्यात जोरदार हाणामारी झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. सिमला येथील इंदिरा गांधी मेडिकल कॉलेज आणि हॉस्पिटल मध्ये उपचारासाठी आलेल्या एका रुग्णाला डॉक्टरने 'तू' म्हटल्यावरून वाद इतका विकोपाला गेला की, त्याचे रूपांतर पुढे लाथाबुक्क्यांच्या हाणामारीत झालं.
१५ सेकंदांच्या या व्हिडिओमध्ये बेडवर झोपलेल्या रुग्णावर आधी डॉक्टर हल्ला करताना दिसत आहे. त्यानंतर रुग्णानेही डॉक्टरवर लाथा मारण्यास सुरुवात केली. यामुळे डॉक्टरचा संयम सुटला आणि त्याने रुग्णावर जोरदार ठोसे मारण्यास सुरुवात केली. डॉक्टरने बेडवरच रुग्णाला बेदम मारहाण केली. या गोंधळादरम्यान आजूबाजूला उपस्थित असलेले लोक मध्यस्थी करण्याचा प्रयत्न करत होते, परंतु डॉक्टरने त्यांनाही फटकारलं. या घटनेनंतर संतप्त झालेल्या लोकांनी रुग्णाच्या समर्थनार्थ आयजीएमसीबाहेर जोरदार घोषणाबाजी केली.
IGMC शिमला का ये वीडियो बिस्तर पर लेटा हुआ व्यक्ति एंडोस्कोपी करवाने अस्पताल आया था।
— Gems of Himachal (@GemsHimachal) December 22, 2025
बात कुछ भी हुई हो इस तरह का व्यवहार किसी डॉक्टर द्वारा निंदनीय है, डॉक्टर भगवान का रूप है पर इस तरह के कुछ लोग इस प्रोफेशन पर सवालिया निशान खड़े करते है
अगर बात हाथापाई तक आई है तो इसके कारण… pic.twitter.com/IWYWHLp0Ob
वादाचं नेमकं कारण काय?
रुग्णाने दिलेल्या माहितीनुसार, तो एंडोस्कोपीसाठी रुग्णालयात आला होता. बेडवर झोपण्यावरून हा वाद सुरू झाला. डॉक्टरने त्याला 'तू' म्हणून संबोधित केलं, ज्यावर रुग्णाने आक्षेप घेतला. त्यावर डॉक्टरने उद्धटपणे वर्तन केलं. जेव्हा रुग्णाने विचारलें की, "तुम्ही घरीही असंच बोलता का?" तेव्हा चिडलेल्या डॉक्टरने त्याच्यावर हल्ला केला. आता रुग्णाचे नातेवाईक डॉक्टरने माफी मागावी आणि त्याला बडतर्फ करावे या मागणीवर ठाम आहेत. मागणी मान्य न झाल्यास आंदोलनाचा इशाराही त्यांनी दिला आहे.
प्रशासनाकडून चौकशी समिती स्थापन
१५ सेकंदांच्या या व्हिडिओने संपूर्ण आरोग्य यंत्रणा हादरवून सोडली आहे. राज्याची राजधानी शिमला येथील सर्वात मोठ्या रुग्णालयात ही घटना घडल्याने खळबळ उडाली आहे. व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर प्रशासन खडबडून जागं झालं आहे. आयजीएमसी रुग्णालय व्यवस्थापनाने या प्रकरणाच्या चौकशीसाठी तीन सदस्यीय समिती स्थापन केली आहे. आयजीएमसीचे एमएस डॉ. राहुल राव यांनी सांगितलं की, "चौकशीत जे काही तथ्य समोर येईल, त्यानुसार संबंधितांवर कडक कारवाई केली जाईल."