ऑनलाइन लोकमत
बेंगळुरु, दि. २८ - सश्याची शिकार करतानाची सेल्फी काढून सोशल मिडीयावर अपलोड केल्याने बेंगळुरुमधील आठ तरुणांच्या अंगलट आले आहे. या जणांविरोधात बेंगळुरुतील वन विभागाने गुन्हा दाखल केला असून यातील चौघा आरोपींना पोलिसांनी अटकही केली आहे.
एच एम नवीन नामक व्यक्तीने पुष्पगिरी अभयारण्यात नुकतेच एका पार्टीचे आयोजन केले होते. या पार्टीत नवीन व त्याच्या मित्रांनी सशाची शिकार केली व त्याचे मटण बनवले. यातील दर्शन पांडे या तरुणाने शिकार केलेल्या सशासोबतची सेल्फी सोशल मिडीयावर अपलोड केली व हा प्रकार उघड झाला. बेंगळुरुतील वनखात्याच्या अधिका-यांनीही ही पोस्ट बघितली व या आठ जणांच्या मागे पोलिसांचा ससेमिरा लागला. दर्शन, नवीन यांच्यासह एकूण आठ जणांविरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. या आठही आरोपींना अटकपूर्व जामीन मंजूर झाला होता. मात्र पोलिसांसमोर जबाब नोंदववा न गेल्याने कोर्टाने जामीन रद्द केला. यानंतर पोलिसांनी चौघांना अटक केली तर उर्वरित चौघे पसार झाले आहेत.