मुस्लिमांच्या प्रजनन दरात वेगानं घट; कोणत्या धर्माचा जन्मदर सर्वाधिक? जाणून घ्या
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 9, 2022 21:49 IST2022-05-09T21:47:30+5:302022-05-09T21:49:40+5:30
मुस्लिम धर्मींयाच्या प्रजनन दरात वेगानं घट; इतर धर्मीयांच्या जन्मदरातही घसरण; पण...

मुस्लिमांच्या प्रजनन दरात वेगानं घट; कोणत्या धर्माचा जन्मदर सर्वाधिक? जाणून घ्या
नवी दिल्ली: वेगानं वाढणाऱ्या देशाच्या लोकसंख्येला काहीसा ब्रेक लागताना दिसत आहे. लोकसंख्या वाढीचा वेग कमी झाला आहे. प्रजनन दरात झालेली घसरण पाहता येत्या काही वर्षांत देशाची लोकसंख्या स्थिर होईल असा अंदाज आहे. राष्ट्रीय कुटुंब आरोग्य सर्वेक्षणातून (एनएफएचएस) महत्त्वाची आकडेवारी समोर आली आहे.
देशातील बालकांच्या जन्माचा दर २.२ वरून २ वर आला आहे. मुस्लिम समाजातील प्रजनन दरात मोठी घसरण पाहायला मिळाली आहे. १९९२-९३ मध्ये ४.४, २०१५-१६ मध्ये २.६ असलेला प्रजनन दर २०१९-२१ मध्ये २.३ वर आला आहे. तरीही इतर धर्मांच्या तुलनेत हा दर अधिक आहे.
सगळ्याच धर्मीयांमध्ये प्रजननाचा दर कमी झाल्याचं आकडेवारी सांगते. पैकी मुस्लिम समाजाचा प्रजनन दर वेगावं खाली आहे. २०१५-१६ मध्ये एनएफएचएसनं चौथं सर्वेक्षण केलं. त्यावेळी मुस्लिमांचा प्रजनन दर २.६२ होता. तो २०१९-२१ मध्ये २.३६ वर आला. ही घसरण ९.९ टक्के इतकी आहे.
पहिलं राष्ट्रीय कुटुंब आरोग्य सर्वेक्षण १९९२-९३ मध्ये झालं. त्यावेळी मुस्लिमांचा प्रजनन दर ४.४१ इतका होता. दुसरं सर्वेक्षण १९९८-९९ मध्ये झालं. त्यावेळी हा दर ३.५९ होता. २००५-०६ मध्ये तो ३.४, २०१५-१६ मध्ये २.६२ वर आला. २०१९-२१ हेच प्रमाण २.३६ वर आलं. मुस्लिमांचा प्रजनन दर वेगानं कमी होत आहे. मात्र अद्यापही तो इतर धर्मीयांपेक्षा अधिक आहे.
राष्ट्रीय कुटुंब आरोग्य सर्वेक्षणानुसार हिंदूंचा प्रजनन दर १.९४ आहे. ख्रिश्चन धर्मीयांचा प्रजनन दर १.८८, शिखांचा १.६१, तर बौद्धांचा १.३९ आहे.