शरद पवारांच्या राष्ट्रपतीपदासाठी डाव्यांची मोर्चेबांधणी
By Admin | Updated: April 23, 2017 19:21 IST2017-04-23T19:21:59+5:302017-04-23T19:21:59+5:30
राजकारणातले चाणक्य समजले जाणारे शरद पवारांच्या नावाची पुन्हा चर्चा सुरू झाली आहे.

शरद पवारांच्या राष्ट्रपतीपदासाठी डाव्यांची मोर्चेबांधणी
ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. 23 - देशाचे सर्वोच्च पद असलेल्या राष्ट्रपतीपदासाठी अनेक नावांची चर्चा असतानाच आता राष्ट्रवादीचे अध्यक्ष आणि राजकारणातले चाणक्य समजले जाणारे शरद पवारांच्या नावाची पुन्हा चर्चा सुरू झाली आहे. भाजपाच्या उमेदवाराला टक्कर देण्यासाठी विरोधी पक्ष ताकदवान उमेदवाराच्या शोधात आहे. त्यामुळे साहजिकच शरद पवारांच्या नावाला पुन्हा एकदा राजकीय ताकद मिळाली आहे. राष्ट्रपतीपदाच्या उमेदवारीसाठी डाव्या पक्षांनी पवारांना सर्वाधिक पसंती दिली आहे.
राष्ट्रपतीपदासाठी विरोधी पक्षांकडून पहिल्यांदा संयुक्त जनता दलाचे नेते शरद यादव यांच्या नावाची चर्चा होती. मात्र, आता त्यांचं नाव अचानक मागं पडलं असून, शरद पवारांचं नाव आघाडीवर आहे. मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे नेते प्रकाश करात आणि सीताराम येच्युरी यांनी शरद पवारांना राष्ट्रपतीपदाचा उमेदवार करण्याची मागणी केली आहे. त्यासाठी त्यांनी पवारांची भेटही घेतली आहे.
ते म्हणाले, "शरद पवार हे विश्वासार्ह नेते असून, त्यांच्याकडे मते ओढून आणण्याची क्षमता आहे. पवार राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत उतरल्यास ते एनडीएची मतंही सहजरीत्या फोडू शकतील. मराठी माणूस म्हणून शिवसेनाही त्यांना मतदान करू शकते. डाव्यांचा असा समज असल्यामुळेच पवारांचं नाव सध्या आघाडीवर आहे.