शरद पवार, राहुल गांधींची खलबते; ‘इंडिया’ आघाडीच्या वाटचालीवर राजधानीत ४० मिनिटे चर्चा
By ऑनलाइन लोकमत | Published: October 7, 2023 06:19 AM2023-10-07T06:19:32+5:302023-10-07T06:19:56+5:30
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी शुक्रवारी काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे तसेच काँग्रेस नेते राहुल गांधी यांची भेट घेतली.
नवी दिल्ली : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी शुक्रवारी काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे तसेच काँग्रेस नेते राहुल गांधी यांची भेट घेतली आणि ३१ ऑगस्ट आणि १ सप्टेंबर रोजी मुंबईत शेवटची बैठक झालेल्या ‘इंडिया’ विरोधी आघाडीच्या आगामी वाटचालीबाबत चर्चा केल्याचे समजते.
मुंबईनंतर विरोधी गटाची बैठक झालेली नाही. परंतु, ती लवकरच होण्याची शक्यता सूत्रांनी व्यक्त केली.
आगामी विधानसभा आणि सार्वत्रिक निवडणुकीत भाजपशी सामना करू पाहणाऱ्या आघाडीसाठी सध्याची राजकीय परिस्थिती आणि पुढील वाटचालीबाबत तिन्ही नेत्यांनी चर्चा केली. ही बैठक सुमारे ४० मिनिटे चालली. त्यात त्यांनी ‘इंडिया’ गटाच्या पुढील बैठकीची योजनाही आखली, असे सूत्रांनी सांगितले.
खरगे यांनी नंतर एक्सवर पवारांसोबतच्या त्यांच्या भेटीची छायाचित्रे पोस्ट केली आणि ही बैठक देशातील लोकांचा आवाज आणखी बुलंद करण्यासाठी होती, असे सांगितले. ‘आम्ही प्रत्येक आव्हानासाठी तयार आहोत,’ असे सांगत त्यांनी ‘इंडिया’ची टॅगलाइन ‘जुडेगा भारत, जीतेगा इंडिया’ वापरली. पवार यांनीही एक्सवर बैठकीची छायाचित्रे पोस्ट केली.