शरद पवारांचा दिल्लीतून PM मोदींवर हल्लाबोल; नेहरूंवरील भाषणाचा घेतला समाचार

By ऑनलाइन लोकमत | Published: February 7, 2024 04:41 PM2024-02-07T16:41:10+5:302024-02-07T17:33:10+5:30

नरेंद्र मोदी यांचं संसदेतील भाषण ऐकून दु:ख झालं. पंतप्रधान हा संपूर्ण देशाचा असतो, तो एका पक्षाचा नसतो, असा टोला शरद पवारांनी लगावला आहे.

Sharad Pawar attacks PM narendra Modi in new Delhi speech | शरद पवारांचा दिल्लीतून PM मोदींवर हल्लाबोल; नेहरूंवरील भाषणाचा घेतला समाचार

शरद पवारांचा दिल्लीतून PM मोदींवर हल्लाबोल; नेहरूंवरील भाषणाचा घेतला समाचार

Sharad Pawar Delhi Speech ( Marathi News ) :  पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज संसदेच्या सभागृहात भाषण करताना काँग्रेसवर जोरदार टीका केली. पंतप्रधान मोदी यांनी आपल्या भाषणात देशाचे माजी पंतप्रधान दिवंगत जवाहरलाल नेहरू यांच्या काही वक्तव्यांचा उल्लेख करत त्यांच्यावरही निशाणा साधला. नरेंद्र मोदी यांच्या याच भाषणावर नाराजी व्यक्त करत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे माजी अध्यक्ष शरद पवार यांनी मोदींना लक्ष्य केलं आहे. 

नवी दिल्ली येथे एका कार्यक्रमादरम्यान विद्यार्थ्यांशी संवाद साधताना शरद पवार म्हणाले की, "पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं संसदेतील भाषण ऐकून दु:ख झालं. कारण पंतप्रधान हा संपूर्ण देशाचा असतो, तो एका पक्षाचा नसतो. मात्र त्यांनी आज आपल्या भाषणात देशाचे पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांच्यावर टीका केली. देशाच्या स्वातंत्र्यासाठी ज्या नेत्यांनी आपला उमेदीचा काळ तुरुंगात घालवला, त्या नेत्यांमध्ये जवाहरलाल नेहरू यांचाही समावेश होता. देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर देशाचा चेहरा बदलण्यासाठी, जगात देशाची प्रतिमा बदलण्याठी ज्यांनी काम केलं त्यामध्ये आपल्याला नेहरूंचं नाव विसरता येणार नाही. जवाहरलाल नेहरू यांनी पंतप्रधानपदाची जबाबदारी खांद्यावर घेतली आणि देशाला प्रजासत्तेच्या मार्गावर घेऊन गेले आणि आज जी लोकशाही आपण बघत आहोत त्या लोकशाहीला ताकद देण्याचं काम नेहरू यांनी केलं. त्यासोबतच देशाच्या विकासासाठी विज्ञान आणि तंत्रज्ञान, जलसंपदा अशा क्षेत्रांत त्यांनी काम केलं. असं योगदान देणाऱ्या पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांच्यावर विद्यमान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज टीका केली," अशा शब्दांत शरद पवार यांनी आपली नाराजी व्यक्त केली.

"राजकारणात वेगवेगळी विचारधारा असते, मतभिन्नता असते, मात्र ज्यांनी देशासाठी काम केलं त्यांच्याकडे दुर्लक्ष करता येत नाही. मग ते जवाहरलाल नेहरू असोत, लाल बहाद्दूर शास्त्री असतील किंवा इंदिरा गांधी, या नेत्यांनी देशासाठी काही ना काही काम केलं आहे. पंतप्रधान मोदींनी त्यांच्यावर टीका केली असली तरी असा चुकीचा इतिहास पसरवणाऱ्या विचारसरणीला दूर ठेवण्याचं काम देशातील नवी पीढी करेल," असा विश्वासही यावेळी शरद पवारांनी व्यक्त केला.

दरम्यान, केंद्रीय निवडणूक आयोगाने राष्ट्रवादीतील राजकीय संघर्षावर निकाल देत अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील गट हाच मूळ राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष असल्याचं सांगितलं आहे. राज्यसभा आणि लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर शरद पवारांसाठी हा मोठा धक्का मानला जात आहे. केंद्रात सत्तेत असलेल्या भाजपच्या दबावातूनच निवडणूक आयोगाने हा निकाल दिल्याचा आरोप शरद पवार गटाकडून केला जात आहे. या पार्श्वभूमीवर शरद पवार हे आगामी काळात पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपविरोधात आणखी आक्रमक होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. 
 

Web Title: Sharad Pawar attacks PM narendra Modi in new Delhi speech

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.