गुरुग्रामच्या प्रसिद्ध मेदांता रुग्णालयातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. उपचार घेत असलेल्या एअर हॉस्टेसवर लैंगिक अत्याचार झाल्याचे समोर आले आहे. या प्रकरणात गुरुग्राम पोलिसांनी मोठी कारवाई करत आरोपीला अटक केली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीची ओळख २५ वर्षीय दीपक अशी झाली आहे, तो बिहारमधील मुझफ्फरपूरचा रहिवासी आहे. दीपक गेल्या ५ महिन्यांपासून मेदांता हॉस्पिटलमध्ये मशीन टेक्निशियन म्हणून काम करत होता. पीडित महिला ४० वर्षांची एअर होस्टेस आहे, ही महिला आजारामुळे रुग्णालयाच्या आयसीयूमध्ये दाखल आहे. यावेळी आरोपीने महिलेवर लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप आहे.
दिल्लीत चार मजली इमारत कोसळली, ४ जणांचा मृत्यू, अनेक जण ढिगाऱ्याखाली अडकले
एका महिलेने १४ एप्रिल (सोमवार), २०२५ रोजी गुरुग्राम पोलिस ठाण्यात ५ एप्रिल रोजी एका खाजगी रुग्णालयात झालेल्या लैंगिक छळाबद्दल तक्रार दाखल केली. यावर गुरुग्राम येथील सदर पोलीस स्टेशनमध्ये संबंधित कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
८०० सीसीटीव्ही तपासल्यानंतर आरोपी सापडला
ही गंभीर घटना उघडकीस आल्यानंतर पोलिसांनी तातडीने तपास सुरू केला. रुग्णालयाच्या परिसरात बसवलेल्या सुमारे ८०० सीसीटीव्ही कॅमेऱ्यांच्या मदतीने आरोपीची ओळख पटवण्यात आली. यानंतर, विशेष तपास पथक स्थापन करण्यात आले. पोलिसांनी दीपकला अटक केली.
मेदांता रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. संजय दुराणी यांनी एक निवेदन प्रसिद्ध केले आहे."आम्हाला पोलिसांकडून माहिती मिळाली की एका संशयास्पद कर्मचाऱ्याची ओळख पटवून त्याला ताब्यात घेण्यात आले आहे. तपास पूर्ण होईपर्यंत आम्ही त्याला निलंबित केले आहे आणि पोलिसांना पूर्ण सहकार्य करत आहोत.", असं यात म्हटले आहे.
या घटनेमुळे रुग्णालयाच्या सुरक्षेबाबत अनेक प्रश्न उपस्थित झाले आहेत. पोलिस या प्रकरणाचा तपास करत आहेत.