पाणी गोठले, उत्तर भारत गारठला; अनेक राज्यांत कडाक्याच्या थंडीचा कहर
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 23, 2024 10:46 IST2024-12-23T10:45:48+5:302024-12-23T10:46:07+5:30
दाट धुक्यामुळे दृश्यमानता घटली

पाणी गोठले, उत्तर भारत गारठला; अनेक राज्यांत कडाक्याच्या थंडीचा कहर
नवी दिल्ली : राजधानी दिल्लीसह उत्तरेकडील राज्यांमधील तापमानात मोठी घट झाली आहे. जम्मू-काश्मीर, लडाख, हिमाचल प्रदेशातील अनेक भागांतील तापमान शून्य अंश सेल्सिअसपेक्षा कमी नोंदवण्यात आले. पंजाब, हरयाणा व राजस्थानात थंडीचा कडाका वाढल्याने दृश्यमानता कमालीची घटली आहे. हिमवृष्टी, कडाक्याच्या थंडीसोबत हवमान विभागाने काही राज्यांत पाऊस पडण्याचा अंदाज व्यक्त केला आहे. जम्मू-काश्मीरच्या श्रीनगरमध्ये उणे ८.५ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. त्यामुळे तब्बल तीन दशकानंतर प्रथमच येथील रात्र सर्वांत थंड नोंदवण्यात आली आहे.
काश्मीर खोऱ्यातील अनेक ठिकाणी रविवारी तापमान शून्याच्या खाली नोंदवण्यात आले. त्यामुळे अनेक ठिकाणी जलपुरवठा करणाऱ्या पाइपलाइनमधील पाणी गोठले आहे. वाढत्या थंडीमुळे वारंवार विद्युत पुरवठा खंडित झाल्याने काश्मीर खोऱ्यातील परिस्थिती जास्तच बिकट झाली आहे. थंडीपासून स्वतःचा बचाव करण्यासाठी काश्मीरच्या नागरिकांनी कांगरी आणि हम्माम यासारख्या पारंपरिक उपायांची मदत घ्यायला सुरुवात केली आहे.
राजधानीत पसरली धुक्याची चादर
कडाक्याच्या थंडीमुळे रविवारी राजधानी दिल्लीत धुक्याची चादर पसरली होती. खराब हवामानामुळे शहरातील तापमान ७.३ अंश सेल्सिअस नोंदवण्यात आले.
येथील हवा गुणवत्ता निर्देशांक (एक्यूआय) अत्यंत खराब म्हणजे ३९३ नोंदवण्यात आल्याचे केंद्रीय प्रदूषण नियंत्रण बोर्डातर्फे स्पष्ट करण्यात आले. रविवारी सकाळी साडेआठ वाजता दिल्लीतील आर्द्रतेची पातळी ९७ टक्के नोंदवली गेली.
थंडीमुळे मुख्यमंत्री अब्दुल्लांचे कार्यक्रम रद्द
जम्मू-काश्मीमध्ये कडाक्याची थंडी वाढल्याने केंद्रशासित प्रदेशचे मुख्यमंत्री उमर अब्दुल्ला यांनी सर्व कार्यक्रम रद्द केले आहेत. थंडीच्या तीव्र लाटेमुळे वीज विभाग व इतर अत्यावश्यक सेवांवर लक्ष ठेवण्यासाठी श्रीनगरमध्येच थांबण्याचा निर्णय मुख्यमंत्र्यांनी घेतला आहे.
थंडीच्या पार्श्वभूमीवर सर्व कार्यक्रम रद्द केले असून, पुढील आठवड्यापर्यंत आपण श्रीनगरमध्येच थांबवणार असल्याचे मुख्यमंत्र्यांनी एक्सद्वारे स्पष्ट केले.
पंजाब, हरयाणात पारा घसरला
पंजाब व हरयाणासोबत राजस्थानच्या बहुतांश भागात थंडीची लाट पसरली आहे. त्यामुळे करौली येथे किमान तापमान ४.५ अंश सेल्सिअस नोंदवण्यात आले.
राज्यातील बहुतांश भागात कोरडे वातावरण असले तरी काही भागांत धुके पसरल्याने दृश्यमानता घटली होती.
संगरिया येथे ५.३, फहेतपूर येथे ५.४, चुरू व अलवर येथे ६.६, श्रीगंगानगर येथे ७, धौलपूर येथे ७.५ अंश सेल्सिअस तापमान होते.