Corona Vaccine: सीरम इंस्टिट्यूटचा मोठा करार; फिलीपींस सरकारला ३ कोटी कोविशिल्ड लसीचा पुरवठा करणार
By प्रविण मरगळे | Updated: January 11, 2021 10:55 IST2021-01-11T10:53:27+5:302021-01-11T10:55:22+5:30
Corona Vaccine: वेबसाइट वर्ल्डोमीटरनुसार फिलीपींसमध्ये ९ कोटी ६ लाख ९० हजार लोक कोरोना संक्रमित झाले होते

Corona Vaccine: सीरम इंस्टिट्यूटचा मोठा करार; फिलीपींस सरकारला ३ कोटी कोविशिल्ड लसीचा पुरवठा करणार
नवी दिल्ली – देशात कोरोना महामारीविरोधात लढण्यासाठी केंद्र सरकारने काही दिवसांपूर्वी भारतातील २ कोरोना लसींना आपत्कालीन वापरासाठी परवानगी दिली आहे. सीरम इंस्टिट्यूटची कोविशिल्ड आणि भारत बायोटेकची कोव्हॅक्सिन यांचा यात समावेश आहे. याच दरम्यान फिलीपींस सरकारने सीरम इंस्टिट्यूटसोबत मोठा करार केला आहे. या करारानुसार सीरम इंस्टिट्यूट फिलीपींसला ३० मिलियन म्हणजे ३ कोटी कोविशिल्ड कोरोना लसीचा पुरवठा करणार आहे.
फिलीपींसमध्ये कोरोनाची स्थिती काय?
वेबसाइट वर्ल्डोमीटरनुसार फिलीपींसमध्ये ९ कोटी ६ लाख ९० हजार लोक कोरोना संक्रमित झाले होते, यातील १९ लाख ४३ हजार लोकांना आपला जीव गमवावा लागला. सध्या २ कोटी ३९ लाख ३६ हजार लोकांना कोरोनाचे उपचार सुरू आहेत, देशात ६ कोटी ४८ लाखाहून अधिक लोक कोरोनामुक्त झालेत.
मानवतेच्या दृष्टीकोनातून भारत मदत करण्यास तयार
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारतातील कोरोना लस उत्पादन करण्याची क्षमता मानवतेच्या दृष्टीकोनातून मदत करण्यास तयार आहे असं सांगितले आहे. जगभरातील ६० टक्के लसीचं उत्पादन भारतात होतं, आजाराविरुद्ध वापरण्यात येत असलेल्या तीन लसींपैकी एका लसीवर मेड इन इंडिया शिक्का लागला आहे. संयुक्त राष्ट्र संघासारखी जागतिक संस्था त्यांच्या गरजेसाठी ६०-८० टक्के लस भारताकडून विकत घेते.
भारतामध्ये बनविण्यात आलेल्या कोरोना लसी मिळविण्यासाठी शेजारी देशांसह इतर खंडातील अनेक देशांनी आता प्रयत्न सुरू केले आहेत. या देशांना कोरोना लसीचा पुरवठा करण्याचा भारताचा विचार आहे. कोरोना साथीवर कोविशिल्ड, कोव्हॅक्सिन लस विकसित झाल्यानंतर आता हे देश भारताकडे आशेने पाहू लागले आहेत. कोरोना लसी घेण्यासाठी म्यानमार व दक्षिण आफ्रिका यांनी याआधीच भारताशी करार केला आहे. नेपाळ, श्रीलंका हे शेजारी देश तसेच कझाकस्तान हे कोरोना लस मिळविण्यासाठी भारताच्या संपर्कात आहेत.
कोरोनावरील उपचारांसाठी हायड्रोक्सिक्लोरोक्विनच्या गोळ्या परिणामकारक ठरतात असे काही शास्रज्ञांचे मत होते. त्या काळात भारताने अमेरिकेसह १५० देशांना हायड्रोक्सिक्लोरोक्विनच्या गोळ्यांचा मोठ्या प्रमाणावर पुरवठा केला होता. मात्र या गोळ्यांचा कोरोना उपचारांत काही प्रभाव पडत नाही, असे दिसल्यानंतर त्या मागविण्याचे प्रमाण थंडावले. कोरोनाच्या उपचारांत उपयोगी ठरणाऱ्या जेनेरिक औषधांचा पुरवठा भारतातून सध्या अनेक देशांना होत आहे.
मध्य आशियातील देशांनाही हवी लस
मध्य आशियातील देशांना कोरोना लसीचा मोठ्या प्रमाणावर पुरवठा करण्याची योजना भारताने आखली आहे. त्यामध्ये बांगलादेश, भूतान, मालदीव, व्हिएतनाम, कंबोडिया, किरगिझस्तान, उझबेकिस्तान या देशांचा समावेश आहे.
अमेरिकेतील आठ राज्यांत नवा विषाणू
अमेरिकेतील आठ राज्यांमध्ये कोरोनाच्या नव्या विषाणूचे रुग्ण आढळून आले असून, त्यांची संख्या वाढती आहे. कॅलिफोर्निया, फ्लोरिडामध्ये नव्या विषाणूच्या रुग्णांची संख्या अधिक आहे. अमेरिकेत दोन कोटी २६ लाख कोरोना रुग्ण आहेत.