दिल्ली पोलिसांनी 'डॉक्टर डेथ' म्हणून प्रसिद्ध असलेल्या एका सिरीयल किलरला अटक केली, जो गेल्या वर्षी पॅरोलवर सुटल्यानंतर फरार झाला होता. गुन्हेगाराला राजस्थानातील दौसा येथील एका आश्रमातून अटक करण्यात आली, जिथे तो पुजारी म्हणून राहत होता. देवेंद्र शर्मा (वय, ६७) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. आयुर्वेद डॉक्टरपासून गुन्हेगार बनलेला आरोपी लोकांची हत्या करून त्यांचे मृतदेह उत्तर प्रदेशातील कासगंज येथील हजारा कालव्यात फेकून द्यायचा.
देवेंद्र शर्माला दिल्ली, राजस्थान आणि हरियाणामध्ये सात वेगवेगळ्या प्रकरणांमध्ये जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली होती आणि गुडगाव न्यायालयाने त्याला मृत्युदंडाची शिक्षाही सुनावली होती. २००२ ते २००४ दरम्यान अनेक टॅक्सी आणि ट्रक चालकांची निर्घृण हत्या केल्याबद्दल देवेंद्र शर्मा तिहार तुरुंगात जन्मठेपेची शिक्षा भोगत होता. परंतु, ऑगस्ट २०२३ मध्ये पॅरोलवर सुटल्यानंतर तो फरार झाला, अशी माहिती पोलिसांनी दिली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी त्याच्या सहकाऱ्यांसह टॅक्सी किंवा ट्रक चालकांना बनावट ट्रिपसाठी बोलावून त्यांची हत्या करायचा आणि त्यांची वाहने विकायचा. यानंतर कोणताही पुरावा शिल्लक राहू नये म्हणून त्यांचे मृतदेह हजारा कालव्यात फेकून द्यायचे. आरोपीवर हत्या, अपहरण आणि दरोड्यासारखे २७ हून अधिक गुन्ह्यांची नोंद आहे. १९९८ ते २००४ दरम्यान बेकायदेशीर मूत्रपिंड प्रत्यारोपण रॅकेट चालवल्याप्रकरणी पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले होते.
पोलीस तपासात आरोपीने पोलिसांना सांगितले की, तो १९९८ मध्ये डॉ. अमितला भेटला. डॉ. अमितने दिल्ली, गुरुग्राम आणि इतर अनेक शहरांमध्ये बेकायदेशीर मूत्रपिंड प्रत्यारोपणाचे केंद्र सुरू केले होते. अमितने देवेंद्रला किडनी डोनर असतील तर त्यांना घेऊन येण्यास सांगितले. यासाठी देवेंद्रला ५ ते ७ लाख रुपये देण्याचे ठरले. यानंतर देवेंद्रने बिहार, बंगाल आणि नेपाळमधील गरीब लोकांना आमिष दाखवून डॉक्टर अमितकडे नेले. देवेंद्रच्या मदतीने अमितने १९९८ ते २००४ या काळात १२५ हून अधिक किडनी प्रत्यारोपण केले. २००४ मध्ये देवेंद्र आणि अमित यांना गुरुग्राममधील किडनी रॅकेट प्रकरणात अटक करण्यात आली.