सरकारी कार्यालयातील कार्यपद्धतीबद्दल 'सरकारी काम आणि सहा महिने थांब', असं मस्करीत म्हटलं जातं. पण, संथगतीने चालणाऱ्या कामामुळे एका ज्येष्ठ दाम्पत्याला वारंवार कार्यालयाच्या चकरा माराव्या लागत होत्या. अधिकारी, कर्मचाऱ्यांकडून घरासंबंधी फाईल पुढे पाठवली जात नसल्याचे मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना कळले आणि त्यांनी कर्मचाऱ्यांना चांगलीच अद्दल घडवली.
नोएडा अथॉरिटी कार्यालयात ही घटना घडली. एका वयोवृद्ध दाम्पत्याने घराशी संबंधित फाईल कार्यालयात दाखल केली होती. ती फाईल मंजूर व्हावी म्हणून ते सातत्याने चकरा मारत होते. अधिकारी कर्मचाऱ्यांकडून दखल घेतली जात नसल्याने दाम्पत्य सीईओंकडे गेले.
नोएडा अथॉरिटीचे सीईओ लोकेश एम यांच्याकडे याबद्दल दाम्पत्याने तक्रार केली. सीईओ लोकेश यांनी कार्यालयातील अधिकारी-कर्मचाऱ्यांना चांगलीच अद्दल घडवली. ज्येष्ठ नागरिकांना चकरा मारताना होणाऱ्या त्रासाची जाणीव व्हावी म्हणून सीईओंनी तशीच शिक्षा दिली.
नोएडा अथॉरिटीच्या गृह विभागाच्या सर्व अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना अर्धा तास उभे राहून काम करण्याची शिक्षा दिली. सीईओंच्या या निर्णयाची आता चर्चा होत आहे. अधिकारी कर्मचारी काम करतात की नाही याची खात्री नंतर सीसीटीव्हीच्या माध्यमातून करण्यात आली.