काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या आणि माजी केंद्रीय मंत्री डॉ. गिरीजा व्यास यांचं आज निधन झालं. त्या ७९ वर्षांच्या होत्या. काही दिवसांपूर्वी पूजा करताना साडीला आग लागून त्या गंभीर जखमी झाल्या होत्या. त्यानंतर त्यांच्यावर उपचार सुरू होते. त्यादरम्यान आज अहमदाबादमधील एका खासगी रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला.
३१ मार्च रोजी गणगौर पूजेदरम्यान, गिरीजा व्यास यांच्या साडीला आग लागली होती. त्यात ९० टक्के भाजून त्या गंभीर जखमी झाल्या होत्या. त्यासोबतचं त्यांना ब्रेन हॅमरेजही झालं होतं. त्यामुळे त्यांची प्रकृती अधिकच गंभीर झाली होती. सतत उपचार सुरू असूनही त्यांच्या प्रकृतीमध्ये फारसा फरक पडत नव्हता. अखेरीस आज त्यांनी या जगाचा निरोप घेतला.
गिरिजा व्यास यांची गणना काँग्रेसच्या आघाडीच्या महिला नेत्यांमध्ये होत असे. त्यांनी केंद्रीय मंत्री, राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्षा, राजस्थान सरकारमध्ये मंत्री तसेच खासदार आणि आमदार म्हणून काम पाहिलं होतं. त्यांनी महिला सशक्तीकरण, शिक्षण आणि सामाजिक न्याय अशा मुद्द्यांवर त्यांनी भरीव काम केलं होतं.