पीएमओ ठाम : शिवसेनेनेही मौन बाळगलेरघुनाथ पांडे, नवी दिल्लीजैतापूर अणुऊर्जा प्रकल्पाविरोधात शिवसेना आक्र मक असल्याचे दिसत असले तरी, प्रत्यक्षात जगातील अत्याधुनिक सुरक्षेचे उपाय वापरून जैतापूर अणुऊर्जा प्रकल्प पूर्ण केला जाईल, ’अशी घोषणा पंतप्रधा़न कार्यालयाने करून शिवसेनेच्या विरोधाची हवा काढली.जैतापूर प्रकल्पामुळे रहिवाशांच्या मनात सुरक्षेबाबत शंकेचे काहूर माजल्याने सरकारने आपली भूमिका स्पष्ट करावी, असा आग्रह भाजपने धरला. तेव्हा सरकारने सुरक्षेची हमी देत शिवसेनेच्या विरोधापुढे सरकार झुकणार नाही, असा सज्जड इशारा दिला. जेव्हा ही घोषणा पंतप्रधान कार्यालयाने सभागृहात केली, तेव्हा सरकारच्या या दमाबाजीपुढे सभागृहात हजर असलेल्या शिवसेनेच्या एकाही खासदाराने विरोध दर्शविला नाही.राजापूर तालुक्यात १० हजार मेगावॅट वीजनिर्मितीचा जैतापूर अणुउर्जा प्रकल्प उभारण्यात येत आहे. या प्रकल्पाला तेथील स्थानिक ग्रामस्थांसह परिसरातील मच्छिमार सात-आठ वर्षांपासून मोर्चा, आंदोलन आदींच्या माध्यमातून विरोध करीत आहेत. राजकारणविरहित सुरू असलेल्या या आंदोलनात सुमारे अडीच-तीन वर्षांपूर्वी शिवसेनेने उडी घेतली. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी प्रकल्पस्थळी येऊन प्रकल्पग्रस्त व मच्छिमारांची भेट घेऊन शिवसेना पूर्ण ताकदीनिशी प्रकल्पग्रस्तांच्या पाठीशी राहील, असे आश्वासन दिले. यासाठी झालेल्या एका आंदोलनात एक तरूणाचा बळीही गेला आहे. हा विषय लोकसभा व विधानसभा निवडणुकीत कोकणच्या अस्मितेचा करून शिवसेनेने मोठा फायदाही करून घेतला. सध्या कोकण या विषयावरून पेटत असताना लोकसभेत बुधवारी जैतापूर प्रकल्पाच्या सुरक्षेबाबत भाजपच्या वतीने प्रश्न विचारला गेला. जैतापूर प्रकल्पामुळे कोकणातील जनतेला सरकारने वाऱ्यावर सोडू नये, त्यांच्या मनात भीती, शंका कुशंकांना जागा असू नये. सरकारने आपली भूमिका स्पष्ट करावी, असे भाजपच्या वतीने वारंवार विचारल्या गेले. तमीळनाडूतील कुडनकुलम प्रकल्पाला जोडून चर्चा झाली. यावेळी केंद्रीयमंत्री अनंत गिंते, विनायक राऊत, अरविंद सावंत यांच्यासह शिवसेनेचे कोकण, मुंबईतील खासदार उपस्थित होते. त्यांनी या चर्चेत सहभागी होण्याची इच्छाही दाखविली नाही.