नवी दिल्ली : पहलगाममधील हल्ल्यास जबाबदार दहशतवादी व या कटात सामील लाेकांना कठाेर शिक्षा दिली जाईल, अशी हमी पंतप्रधान नरेद्र माेदी यांनी रविवारी पुन्हा दिली. हल्ल्यातील पीडितांना निश्चित न्याय मिळेल, असे मोदी म्हणाले.
‘मन की बात’ कार्यक्रमात ते म्हणाले, ‘हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे. दहशतवादा विरुद्धच्या लढाईत देशाच्या १४० कोटी लाेकांमधील एकजूट ही आपली खरी शक्ती आहे. ही शक्तीच दहशतवादाविरुद्धच्या निर्णायक लढाईचा आधार आहे. जगभरातून अनेकांनी पत्र पाठवून या हल्ल्याचा निषेध केला. या लढाईत अवघे जग १४० कोटी भारतीयांसह सहभागी आहे.
...म्हणून हा हल्ला झाला
पहलगाम हल्ला हा दहशतवाद पोसणाऱ्यांमधील नैराश्याचे प्रतीक आहे. काश्मीर खोऱ्यात आता शाळा-महाविद्यालयांत पुन्हा सामान्य स्थिती निर्माण झाली होती. पायाभूत क्षेत्रातील प्रकल्पांच्या कामानेही गती घेतली होती. लोकशाही भक्कम होत असताना पर्यटकांची संख्याही विक्रमी दराने वाढत होती. यासोबत युवकांना रोजगाराच्या नव्या संधी निर्माण होत होत्या. त्यामुळे त्यांच्यात नैराश्य निर्माण झाल्याचे मोदी यांनी नमूद केेले.
दहशतवादी हल्ल्यानंतर काश्मीरमधील पर्यटन व्यवसायाला मोठा फटका बसला असून, ७० ते ९० टक्के लोकांनी बुकिंग रद्द केले आहेत. अनेक हॉटेल्स रिकामी आहेत. इतर व्यवसायही घसरले आहेत. श्रीनगरमधील दललेक येथे असलेले शिकारा व्यवसायिकही पर्यटक नसल्याने हवालदिल झाले आहेत.
काश्मीर येथील हल्ल्यानंतर आता पर्यटक काश्मीर ऐवजी कुठे जाता येईल, याचा पर्याय शोधू लागले आहेत. मसूरी, देहरादून , ऋषिकेश, नैनीताल, कुल्लू, मनाली, स्पीति अशा पर्यायी ठिकाणांकडे लोकांचा कल वाढला आहे. लाहौल स्पीति येथे येणाऱ्या पर्यटकांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढू लागली आहे.
श्रीनगर : कुपवाडा जिल्ह्यात संशयित दहशतवाद्यांनी एका सामाजिक कार्यकर्त्याची गोळ्या झाडून हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.
गुलाम रसूल माग्रे असे हत्या झालेल्या ४५ वर्षीय व्यक्तीचे नाव आहे. शनिवारी रात्री घरात घुसून दहशतवाद्यांनी रसूल यांच्यावर गोळ्या झाडल्या व ते पसार झाले.
गोळीबाराचा आवाज ऐकून तिथे आलेल्या शेजाऱ्यांनी पोलिसांना ही माहिती दिली. रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या रसूल यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले.
डॉक्टरांनी तपासणी केल्यानंतर त्यांना मृत घोषित केले. याप्रकरणी गुन्हा दाखल झाला आहे. हल्लेखोरांचा शोध सुरु आहे.