अनैतिक संबंधांतून उत्तर दिल्लीतील गुलाबी नगर परिसरात एक गंभीर गुन्हा घडला आहे. येथे एका व्यक्तीने त्याच्या पत्नीला एका १७ वर्षांच्या मुलासोबत आक्षेपार्ह स्थितीत पाहिल्यानंतर त्या मुलाची डोक्यावर सिलेंडर मारून हत्या केली. मुकेश कुमार असं या प्रकरणातील आरोपीचं नाव असून, त्याला पोलिसांनी घटनास्थळावरून ताब्यात घेत अटक केली आहे.
या हत्याकांडाबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार शेजाऱ्यांना घराच्या बाहेरील नाल्यातून रक्त वाहताना दिसल्याने त्यांनी याची माहिती फोन करून पोलिसांना दिली. त्यानंतर पोलीस घटनास्थळी पोहोचले तेव्हा एक मुलगा रक्तबंबाळ स्थितीत पडलेला होता. तर आणखी एक तरुण त्या खोलीत उपस्थित होता.
पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितले की, अल्पवयीन तरुण हा दहा दिवसांपूर्वीच कामाच्या शोधात दिल्लीमध्ये आला होता. तो आरोपी मुकेश ठाकूर याच्या पत्नीच्या ओळखीतल्या व्यक्तीच्या माध्यमातून त्यांच्या घरात भाडेकरू म्हणून आला होता. १९ आणि २० मे च्या रात्री मुकेश ठाकूर आणि या अल्पवयीन मुलाने मद्यप्राशन केलं होतं.
त्याच रात्री आरोपी मुकेश याने या मुलाला त्याच्या पत्नीसोबत आक्षेपार्ह स्थितीत पाहिलं. त्यानंतर सकाळी त्याची पत्नी कामावर गेली. ती गेल्यानंतर घरात मुकेश आणि त्या मुलामध्ये वादावादी झाली. तसेच त्यावेळी रागाच्या भरात मुकेश याने त्या मुलाच्या डोक्यात छोट्या सिलेंडरने वार केले. त्यामुळे त्याचा जागीच मृत्यू झाला.