Amarnath Yatra: अमरनाथ यात्रेसाठी यंदा कडक सुरक्षा व्यवस्था
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 15, 2025 14:17 IST2025-06-15T14:15:37+5:302025-06-15T14:17:22+5:30
Amarnath Yatra Security: जम्मू: अमरनाथ यात्रामार्गावर यंदा सुरक्षा बंदोबस्त प्रचंड वाढवण्यात आला आहे.

Amarnath Yatra: अमरनाथ यात्रेसाठी यंदा कडक सुरक्षा व्यवस्था
सुरेश एस. डुग्गर,
लोकमत न्यूज नेटवर्क
जम्मू: अमरनाथ यात्रामार्गावर यंदा सुरक्षा बंदोबस्त प्रचंड वाढवण्यात आला आहे. ‘ऑपरेशन सिंदूर’च्या पार्श्वभूमीवर संभाव्य हल्ल्यांचा धोका लक्षात घेता जम्मू-काश्मीर पोलिस, लष्कर, केंद्रीय राखीव पोलिस दलासह निमलष्करी दलाचे जवानही तैनात करण्यात आले आहेत.
पवित्र अमरनाथ गुहेत दर्शन घेण्यासाठी यंदा यात्रेकरूंची गर्दी होण्याची शक्यता पाहता हा बंदोबस्त करण्यात आला आहे. या देवस्थानात जम्मू-काश्मीरचे नायब राज्यपाल मनोज सिन्हा यांच्या हस्ते पहिली पूजा करण्यात आली असून, बाबा बर्फानींच्या दर्शनासाठी औपचारिकदृष्ट्या यात्रा प्रारंभ झाली आहे. प्रत्यक्ष यात्रा ३ जुलै ते ९ ऑगस्टपर्यंत चालेल. यंदा अमरनाथ यात्रा ५२ दिवसांऐवजी ३८ दिवसांची असणार आहे.
यंदाची सुरक्षा व्यवस्था पाहता यात्रेकरूंनी फार चिंता करण्याची गरज नाही, असे सिन्हा यांनी म्हटले आहे. मात्र, अधिकाऱ्यांच्या मते यंदा या यात्रेत सावधगिरी बाळगणे आवश्यक आहे. पाकिस्तानी ‘आयएसआय’चे हस्तक या यात्रेत यंदा कारवाया करू शकतात. त्यामुळे सुरक्षा व्यवस्था वाढवली आहे.
यात्रेचे दोन मार्ग
परंपरागत पहलगामच्या चंदनबाडीहून एक मार्ग असून, दुसरा मार्ग बालाटालमार्गे आहे. जुना मार्ग थोडा लांबचा आहे.
पहलगामपासून गुहेपर्यंतचा मार्ग ४८ किमी तर बालाटाल मार्ग १४ किमीचा आहे. दोन्ही मार्गांवर सुरक्षाविषयक ऑडिट केले आहे.
अशी असेल सुरक्षा
यात्रेत यंदा सुरक्षा जवानांच्या ताफ्यासह जॅमर असतील. मागे-पुढे एक्स्कॉर्ट वाहने असतील. तत्पर कृती दलाची पथके असतील. बॉम्बशोधक पथके, पोलिसांचे श्वानपथक आणि हेलिकॉप्टरसह आधुनिक उपकरणांनी निगराणी केली जाईल.