Naxal encounter Bijapur: दंतेवाडा-विजापूरच्या सीमेवर पोलिसांची नक्षलवाद्यांसोबत जोरदार चकमक झाली. यात कुख्यात महिला नक्षलवादी रेणुका उर्फ बानू ठार झाली आहे. तिच्याजवळ एक इन्सास रायफल मिळाली आहे. पोलिसांनी तिच्यावर २५ लाखांचे बक्षीस जाहीर केले होते. सोमवारी दंतेवाडा-बिजापूरच्या सीमेवर अचानक पोलीस आणि नक्षली आमने-सामने आले आणि ही धुमश्चक्री सुरू झाली.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
पोलीस, सुरक्षा जवान आणि नक्षलवाद्यांमध्ये गेल्या पाच ते सहा दिवसांपासून बिजापूर, दंतेवाडा, सुकमा आणि बस्तर या भागांमध्ये चकमकी सुरू आहेत. या भागात झालेल्या चकमकींमध्ये पोलीस, सुरक्षा जवानांनी नक्षली चळवळीवर मोठा वार केला आहे.
बिजापूरच्या सीमेजवळ चकमकीत रेणुका ठार
सोमवारी दंतेवाडा-बिजापूरच्या सीमेलगत असलेल्या भागात पोलीस आणि नक्षलवाद्यांची चकमक झाली. सोमवारी सकाळी सुरू झालेली चकमक शेवटची माहिती हाती आली, तोपर्यंत सुरूच होती. दंतेवाडाचे पोलीस अधीक्षक गौरव राय यांनीही याला दुजोरा दिला आहे.
कोण होती रेणुका, DKSZCM म्हणजे काय?
DKSZC म्हणजे दंडकारण्य विशेष विभागीय समिती सदस्य (Dandakaranya Special Zonal Committee member). हे नक्षली संघटनेतील एक महत्त्वाचे आणि मोठे पद आहे. ही व्यक्ती छत्तीसगढ, महाराष्ट्र, ओडिशा आणि तेलंगणामधील नक्षलग्रस्त भागात सक्रियपणे काम करते. रेणुका ही दंडकारण्य विशेष विभागीय समितीची सदस्य होती.
नक्षलवादी चळवळीत 'डीकेएसझेडसीएम'ला सर्व महत्त्वाचे निर्णय घेण्याचा अधिकार असतो. यात नक्षल्यांची मोहिमेचे नियोजन, रणनीती आणि कार्य यावर देखरेख करण्याचे काम यांचा समावेश असतो. या समितीच्या सदस्यांना मोठ्या हल्ल्याच्या मोहिमांची जबाबदारी दिली जाते. त्यामुळे रेणुकावर २५ लाखांचे बक्षीस जाहीर करण्यात आले होते.