- शीलेश शर्मा, नवी दिल्लीभूसंपादनावरील संयुक्त संसदीय समितीच्या गुरुवारी येथे आयोजित बैठकीला सदस्य तर हजर झाले. मात्र, मंत्रालय सचिवांनी दांडी मारल्याने प्रचंड गोंधळ निर्माण झाला. अखेर ही बैठक कुठल्याही निर्णयाशिवाय गुंडाळावी लागली. पुढील बैठक २२ जुलैला घेण्याचे ठरले आहे. खरे तर आजच्या बैठकीत समितीला अंतिम निर्णय घ्यायचा होता; परंतु तो होऊ शकला नाही. त्यामुळे समितीला ठराविक कालावधीत आपला अहवाल संसदेला सुपूर्द करणे शक्य होणार नाही. उच्चस्तरीय सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार भूसंपादनाच्या मुद्यावर संसदीय समितीत विचारविनिमय सुरू असताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नीती आयोगाच्या बैठकीत मुख्यमंत्र्यांसोबत यावर चर्चा का केली या बाबीवर समितीच्या सदस्यांचा अधिक आक्षेप होता. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार बैठकीत फार नाराज दिसले. त्यांनी पंतप्रधानांवर संसदेकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप करून त्यांच्या या भूमिकेवर कठोर टीका केली. संसद ही सर्वोच्च असून ही समिती संसदेने स्थापन केली आहे. अशा परिस्थितीत पंतप्रधान समितीला कमी कसे लेखतात? असा पवार यांचा सवाल होता. समाजवादी पार्टीचे नेते रामगोपाल हेसुद्धा रागात होते. मोदींवर हल्लाबोल करताना पंतप्रधान समांतर व्यवस्था चालवीत असून हे कदापि स्वीकारार्ह नाही, असा आरोप त्यांनी केला.
भूसंपादन बैठकीला सचिवांची दांडी
By admin | Updated: July 17, 2015 04:36 IST