दिल्ली-हरियाणा भूकंपाच्या धक्क्यांनी पुन्हा हादरलं; सलग दुसऱ्या दिवशी जाणवले भूकंपाचे तीव्र धक्के

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 11, 2025 20:56 IST2025-07-11T20:39:00+5:302025-07-11T20:56:13+5:30

भूकंपाच्या तीव्र धक्क्यांनी दिल्ली आणि हरियाणाचा परिसर हादरून गेला आहे.

Second time in 24 hours earthquake tremors have been felt in Delhi NCR | दिल्ली-हरियाणा भूकंपाच्या धक्क्यांनी पुन्हा हादरलं; सलग दुसऱ्या दिवशी जाणवले भूकंपाचे तीव्र धक्के

दिल्ली-हरियाणा भूकंपाच्या धक्क्यांनी पुन्हा हादरलं; सलग दुसऱ्या दिवशी जाणवले भूकंपाचे तीव्र धक्के

Delhi Earthquake: दिल्ली-एनसीआर आणि हरियाणाच्या झज्जर आणि रोहतक जिल्ह्यांमध्ये संध्याकाळच्या सुमारास भूकंपाचे तीव्र धक्के जाणवले. भूकंपाची तीव्रता रिश्टर स्केलवर ३.७ इतकी नोंदवली गेली. अचानक झालेल्या या धक्क्यांमुळे काही काळ घबराट निर्माण झाली. लोक घाबरून घराबाहेर पडले, परंतु कोणत्याही प्रकारची जीवित किंवा वित्तहानी झाल्याची माहिती समोर आलेली नाही. आठवड्यात दुसऱ्यांदा भूकंपाचे धक्के जाणावल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झालं आहे.

शुक्रवारी संध्याकाळी ७:४९ वाजता दिल्ली-एनसीआरमध्ये सलग दुसऱ्या दिवशी भूकंपाचे धक्के जाणवले. दिल्ली आणि गुरुग्राम सारख्या एनसीआरच्या काही भागात भूकंपाचे धक्के जाणवले. एकाच आठवड्यात दिल्ली आणि गुरुग्राम, फरीदाबाद, रोहतक आणि हरियाणाच्या आसपासच्या शहरांमध्ये भूकंपाचे धक्के जाणवण्याची ही दुसरी वेळ आहे.

या भूकंपाचे केंद्र हरियाणातील झज्जर येथे असल्याचे म्हटलं आहे. राष्ट्रीय भूकंपशास्त्र केंद्राच्या मते, भूकंपाची खोली १० किलोमीटर होती आणि त्याचे अक्षांश २८.६८ अंश उत्तर आणि रेखांश ७६.७२ अंश पूर्व होते. "लोक घाबरलेले दिसत आहेत. केंद्रबिंदू झज्जर असल्याचेही सांगण्यात आले होते. आज देखील आम्हाला भूकंपाचे धक्के जाणवले. आम्ही देवाकडे प्रार्थना करत आहोत," असं हरियाणातील स्थानिकांनी म्हटलं.

दरम्यान, गुरुवारीही दिल्ली एनसीआरमध्ये भूकंपाचे जोरदार धक्के जाणवले होते. १० मिनिटे जमीन हादरत राहिली आणि लोक त्यांच्या घरातून आणि कार्यालयातून बाहेर पडले. या भूकंपाची तीव्रता ४.४ इतकी होती. त्या भूकंपाचे केंद्रबिंदू झज्जरच्या ईशान्येस ३ किलोमीटर आणि दिल्लीच्या पश्चिमेस ५१ किलोमीटर अंतरावर जमिनीपासून १० किलोमीटर खोलीवर होते. सकाळी ९:०४ वाजता भूकंपाचे धक्के जाणवले. झज्जर व्यतिरिक्त, शेजारच्या रोहतक आणि गुडगाव जिल्हे, पानीपत, हिसार आणि मेरठ येथेही भूकंपाचे धक्के जाणवले होते. त्यानतंर आता सलग दुसऱ्या दिवशी भूकंपाचे धक्के जाणवल्यानंतर लोकांमध्ये घबराट पसरली आहे. 

Web Title: Second time in 24 hours earthquake tremors have been felt in Delhi NCR

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.