Second phase of restrictions lifted after June 8; Prime Minister's Sutovach | निर्बंध हटविण्याचा दुसरा टप्पा ८ जूननंतर; पंतप्रधानांचे सुतोवाच

निर्बंध हटविण्याचा दुसरा टप्पा ८ जूननंतर; पंतप्रधानांचे सुतोवाच

हरीश गुप्ता ।
लोकमत न्यूज नेटवर्क
नवी दिल्ली : कोरोना साथ फार फैलू नये यासाठी लागू केलेल्या लॉकडाऊनमधील निर्बंध मागे घेण्याचा दुसरा टप्पा येत्या सोमवारी, ८ जूननंतर अमलात येणार आहे, अशी घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली.

कॉन्फडरेशन आॅफ इंडियन इंडस्ट्री (सीआयआय)च्या वार्षिक कार्यक्रमामध्ये त्यांनी मंगळवारी आवाहन केले की, उद्योजकांनी एक पाऊल पुढे यावे, केंद्र सरकार चार पावले पुढे येईल. आम्ही उद्योग क्षेत्राच्या पाठीशी ठामपणे उभे आहोत.
कोरोना साथीमुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २५ मार्च रोजी देशव्यापी लॉकडाऊन पुकारला. तेव्हापासूनच्या ७० दिवसांत या लॉकडाऊनचे चार टप्पे झाले. देशात उद्योगधंदे व सार्वजनिक, खासगी वाहतूक सेवा बरेच दिवस बंद होती. साथ व लॉकडाऊनमुळे सर्व व्यवहार ठप्प झाल्याने लाखो लोक बेकार झाले, स्थलांतरित मजुरांना आपल्या गावी परत जाताना खूप हाल सोसावे लागले. लॉकडाऊन जाहीर करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आरोग्यतज्ज्ञांचा सल्ला महत्त्वाचा मानला होता. आता त्यांनी अर्थव्यवस्था पुन्हा रुळावर आणण्यास प्राधान्य दिले आहे.


सीआयआयचा वार्षिक कार्यक्रम यंदा व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून पार पडला. त्यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, लॉकडाऊन मागे घेण्याच्या प्रक्रियेतील पहिल्या टप्प्यात बरेच निर्बंध हटविण्यात आले. आता दुसऱ्या टप्प्यात आणखी निर्बंध दूर करण्यात येतील. देशामध्ये लॉकडाऊनची असलेली स्थिती आता हळूहळू बदलत असून, आपण आत्मनिर्भर भारताच्या दिशेने वाटचाल करीत आहोत. देशात तीन महिन्यांपूर्वी एकही पर्सनल प्रोटेक्टिव्ह इक्विपमेंटचा (पीपीई) संच बनत नव्हता. आता दर दिवसाला तीन लाख पीपीई संच तयार होत आहेत. आत्मनिर्भर भारत निर्माण करण्यासाठी केंद्र सरकार प्रयत्नशील असून, सीआयआयने प्रत्येक क्षेत्राच्या विकासाबाबत आराखडा तयार करून तो सरकारला सादर करावा. आम्ही ते आराखडे राबविण्यासाठी पावले उचलणार आहोत.


लॉकडाऊनचा निर्णय योग्यच
मोदी म्हणाले की, देशामध्ये लॉकडाऊन लागू करण्याचा निर्णय योग्यच होता. त्यामुळे देशाने हव्या त्या गोष्टी साध्य केल्या आहेत. कोरोनाच्या साथीमुळे देशाच्या अर्थविकासाचा वेग कमी झाला असेल; पण आता त्यावर मात करून आम्हाला पुढे जायचे आहे.


रोजगार, विश्वास निर्माण करायचा आहे
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितले की, देशातील प्रतिभा, क्षमता व तंत्रज्ञानावर मला पूर्ण विश्वास आहे. स्वदेशात आपल्याला यापुढे अशी उत्पादने बनवायची आहेत जी जागतिक बाजारपेठेत अव्वल ठरतील. रोजगार व विश्वास निर्माण करणे, हा आत्मनिर्भर भारताचा खरा अर्थ आहे. कोरोना विषाणूशी लढता-लढता आपल्याला देशाच्या अर्थव्यवस्थेलाही उभारी देण्याचे काम करायचे आहे.

वाचकहो, 'लोकमत'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatNews ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: Second phase of restrictions lifted after June 8; Prime Minister's Sutovach

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.