बाजारातील घडामोडींवर लक्ष ठेवण्यास सेबी सज्ज
By Admin | Updated: May 16, 2014 04:53 IST2014-05-16T04:53:38+5:302014-05-16T04:53:38+5:30
लोकसभा निवडणूक मतमोजणीच्या पार्श्वभूमीवर शेअर बाजारातील कोणत्याही अनियमित व्यवहारांवर लक्ष ठेवण्यास सेबी , आर.बी.आय आणि केंद्र सरकार सज्ज असल्याचे सेबीचे अध्यक्ष यू.के.सिन्हा यांनी सांगितले.

बाजारातील घडामोडींवर लक्ष ठेवण्यास सेबी सज्ज
नवी दिल्ली : लोकसभा निवडणूक मतमोजणीच्या पार्श्वभूमीवर शेअर बाजारातील कोणत्याही अनियमित व्यवहारांवर लक्ष ठेवण्यास भारतीय प्रतिभूती नियंत्रण मंडळ (सेबी), भारतीय रिझर्व्ह बॅँक आणि केंद्र सरकार सज्ज असल्याचे सेबीचे अध्यक्ष यू.के.सिन्हा यांनी सांगितले. बाजारातील घडामोडींवर आमचे बारीक लक्ष राहणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. असोसिएटेड चेंबर्स आॅफ कॉमर्स अॅण्ड इंडस्ट्री आॅफ इंडिया (असोचेम)च्या सभेत बोलताना सिन्हा यांनी हे स्पष्टीकरण दिले. या बैठकीत सदस्यांशी बातचित करताना सिन्हा यांनी सांगितले की, सेबी, भारतीय रिझर्व्ह बॅँक आणि केंद्र सरकार यांनी शेअर बाजारात होणार्या कोणत्याही अनियमित हालचालींवर कसे नियंत्रण आणायचे याबाबतचे धोरण तयार केले आहे. त्यामुळे निवडणूक निकालांच्या पार्श्वभूमीवर बाजारात काही अनियमित व्यवहार होऊ नयेत, यासाठी आमचे प्रयत्न आहेत. निवडणूक निकालांच्या अंदाजावर बाजार सातत्याने वाढत असताना अनपेक्षित निकाल लागल्यास त्याचे बाजारावर काय परिणाम होऊ शकतात याचे ठोकताळे आम्ही बांधले असून, बाजारात व्यवहार करणार्या प्रत्येकावर आमचे बारकाईने लक्ष आहे. धोका व्यवस्थापन यंत्रणेची आम्ही वारंवार चाचणी घेतली असून, तिच्यामध्ये कोणतेही दोष नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. (लोकमत न्यूज नेटवर्क) बाजारातील लहान-लहान गुंतवणूकदारांच्या हिताचे रक्षण करण्याचा सेबीचा प्रयत्न असल्याचे सिन्हा यांनी स्पष्ट केले. याबाबत आंतरराष्टÑीय हेज फंडांकडून चांगला प्रतिसाद मिळत असल्याचे त्यांनी सांगितले. शेअर बाजारात प्रारंभिक भांडवल विक्री करून भांडवल उभारताना कंपन्यांनी समभागांची किंमत योग्य लावण्याचा सल्लाही सिन्हा यांनी दिला. गतवर्षात या माध्यमातून अवघे १३ हजार कोटी रुपये उभारण्यात आले आहेत, तर सुमारे ६० हजार कोटी रुपये उभारण्याचे प्रस्ताव मागे घेतले गेले आहेत. हे का होते याचा कंपन्यांनी गंभीरपणे विचार करणे गरजेचे असल्याचेही सिन्हा म्हणाले. बाजारातील कंपन्यांपैकी दोनतृतीयांश कंपन्यांचे समभाग इश्यू किमतीपेक्षा कमी दराने बाजारात विकले जात असल्याची माहितीही त्यांनी दिली.