जम्मू आणि काश्मीरमधील पहलगामच्या बैसरण घाटीत फिरायला आलेल्या पर्यटकांवर गोळीबार करून त्यांची हत्या करणाऱ्या दहशतवाद्यांना शोधण्याचा सर्वोतोपरि प्रयत्न सुरक्षा यंत्रणा करत आहेत. पहलगाम दहशतवादी हल्ल्यातील गुन्हेगार अजूनही फरार आहेत. २२ एप्रिल रोजी झालेल्या हल्ल्यातील गुन्हेगारांचे फोटो सुरक्षा यंत्रणेकडून प्रसिद्ध करण्यात आले होते. त्यांना शोधून देणाऱ्या किंवा त्यांची माहिती देणाऱ्यास २० लाखांचं बक्षीस देखील जाहीर करण्यात आलं आहे. मात्र, अद्याप त्यांना पकडण्यात यश आलेलं नाही. आता या वॉन्टेड दहशतवाद्यांचे पोस्टर जम्मू-काश्मीरमध्ये ठिकठिकाणी लावले जात आहेत.
पहलगाममध्ये फिरायला आलेल्या पर्यटकांवर त्यांचा धर्म विचारून, मग गोळी मारून त्यांची हत्या करण्यात आली. या दहशतवादी हल्ल्यात तब्बल २६ जणांचा मृत्यू झाला. या हल्ल्यानंतर देशभरात संतापाची लाट उसळली होती. या हल्ल्यानंतर पोलिसांनी या दहशतवाद्यांचा शोध सुरू केला आहे. सगळ्यात आधी त्यांचे स्केच प्रसिद्ध करण्यात आले होते. आता त्यांचे फोटो देखील प्रसिद्ध करण्यात आले आहेत.
ठिकठिकाणी लावले जाताहेत पोस्टर्स
आता जम्मू काश्मीर, शोपियानमध्ये ठिकठिकाणी दहशतवाद्यांचे पोस्टर्स लावले जात आहेत. या दहशतवाद्यांना लवकरात लवकर शोधण्यासाठी वेगवेगळी माहिती जमा केली जात आहे. पहलगाम हल्ल्यात लष्कर-ए-तोयबाचे दहशतवादी सामील होते. यामध्ये पाकिस्तानातील हाशिम मुसा उर्फ सुलेमान आणि अली भाई उर्फ तल्हा भाई यांचा समावेश आहे. तर, आदिल ठोकर हा अनंतनाग येथील स्थानिक आहे.
पहलगाममधील 'मिनी स्वित्झर्लंड' म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या पर्यटन स्थळावर झालेल्या दहशतवादी हल्ल्यात २६ जणांचा मृत्यू झाला होता. मृतांमध्ये बहुतेक पर्यटक पुरुष होते. त्यानंतर अनंतनाग पोलिसांनी त्यांच्या एक्स हँडलवर एक पोस्ट शेअर करत म्हटले होते की, "या भ्याड कृत्यात सहभागी असलेल्या दहशतवाद्यांची माहिती देणाऱ्या व्यक्तीला २० लाख रुपयांचे बक्षीस दिले जाईल. तसेच, माहिती देणाऱ्याची ओळख गुप्त ठेवली जाईल."
ऑपरेशन सिंदूर करून दिले प्रत्युत्तर
बक्षीस जाहीर होण्याच्या काही काळापूर्वी, सुरक्षा एजन्सींनी पहलगाम दहशतवादी हल्ल्यात सहभागी असल्याचा संशय असलेल्या ३ लोकांचे रेखाचित्र जारी केले होते. भारत सरकारने या दहशतवादी हल्ल्याचा बदला घेण्यासाठी 'ऑपरेशन सिंदूर' सुरू केले आणि पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीर (पीओके) मधील अनेक ठिकाणांवर निशाणा साधून दहशतवाद्यांचे अड्डे उद्ध्वस्त केले.