दगडातून इतिहास साकारणारे शिल्पकार राम सुतार कालवश; वयाच्या १०१ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 19, 2025 06:52 IST2025-12-19T06:51:19+5:302025-12-19T06:52:28+5:30
गुजरातमध्ये जगातील सर्वात उंच पुतळा 'स्टॅच्यू ऑफ यूनिटी' साकारणारे प्रसिद्ध शिल्पकार राम सुतार यांचे बुधवारी नॉयडा येथे दीर्घ आजाराने निधन झाले. ते १०१ वर्षांचे होते.

दगडातून इतिहास साकारणारे शिल्पकार राम सुतार कालवश; वयाच्या १०१ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
नवी दिल्ली: गुजरातमध्ये जगातील सर्वात उंच पुतळा 'स्टॅच्यू ऑफ यूनिटी' साकारणारे प्रसिद्ध शिल्पकार राम सुतार यांचे बुधवारी नॉयडा येथे दीर्घ आजाराने निधन झाले. ते १०१ वर्षांचे होते. सुतार यांनी देशभरात अनेक उत्तमोत्तम स्मारकशिल्पे बनवली. त्यांचा दगड व संगमरवरातील शिल्पकामात हातखंडा असला तरी ब्राँझा धातूत त्यांनी केलेले शिल्पकाम उत्कृष्ट समजले जाते. संसदेच्या आवारातील 'महात्मा गांधी यांचे ध्यानस्थ अवस्थेतील १७फूट उंचीचे त्यांनी साकारलेले शिल्प हे अत्यंत गाजलेले शिल्प होय.
महापुरुषांचे पुतळे ठरले सर्वोत्तम शिल्पकृती
संसद भवन आवारातील छत्रपती शिवरायांचे अश्वारूढ शिल्पही सर्वोत्तम शिल्पकलेत गणले जाते. डॉ. बाबासाहेब आंबेडकर, महात्मा फुले, सावित्रीबाई फुले यांसह अनेक महापुरुषांचे पुतळे त्यांनी साकारले. मुंबईतील इंदू मिल येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक कामात ते सहभागी होते.
"राम सुतार यांच्या कलाकृती नेहमीच भारताचा इतिहास आणि संस्कृतीच्या शक्तिशाली अभिव्यक्ती होत्या." - नरेंद्र मोदी, पंतप्रधान
"राम सुतार यांच्या स्टॅच्यू ऑफ युनिटीसह कलाकृती भारताच्या गौरवशाली वारशाचे प्रतीक आहेत. त्यांची कला अनेक पिढ्यांना प्रेरणा देत राहील." -द्रौपदी मुर्मू, राष्ट्रपती
"शिल्पकलेतील एका युगाचा अंत झाला आहे. राम सुतार यांच्या कलाकृती जिवंत भावमुद्रांसाठी ओळखल्या जातात." -देवेंद्र फडणवीस, मुख्यमंत्री