तासनतास 'मन की बात' करणारे पंतप्रधान मणिपूरवर फक्त ३६ सेकंद बोलले, सत्यपाल मलिकांचा मोदींवर निशाणा
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 21, 2023 14:51 IST2023-07-21T14:09:08+5:302023-07-21T14:51:41+5:30
काही सेकंदांचे त्यांचे विधान सर्वांनाच चकित करणारे आहे, असे सत्यपाल मलिक यांनी म्हटले आहे.

तासनतास 'मन की बात' करणारे पंतप्रधान मणिपूरवर फक्त ३६ सेकंद बोलले, सत्यपाल मलिकांचा मोदींवर निशाणा
नवी दिल्ली : जम्मू-काश्मीरचे माजी राज्यपाल सत्यपाल मलिक (Satya Pal Malik) हे आपल्या वक्तव्यामुळे चर्चेत असतात. दरम्यान, मणिपूरमध्ये महिलांना नग्न करून त्यांची धिंड काढत त्यांच्यावर अत्याचार केल्याचा व्हिडीओ व्हायरल झाल्याच्या घटनेनंतर सत्यपाल मलिक हे आपल्या वक्तव्यामुळे चर्चेत आले आहेत. यावेळी सत्यपाल मलिक यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर निशाणा साधला आहे.
मन की बातसह इतर मुद्द्यांवर तासनतास बोलणारे पंतप्रधान नरेंद्र मोदी मणिपूरमध्ये घडलेल्या अमानुष आणि लज्जास्पद घटनेबद्दल केवळ ३६ सेकंद बोलले. काही सेकंदांचे त्यांचे विधान सर्वांनाच चकित करणारे आहे, असे सत्यपाल मलिक यांनी म्हटले आहे. सत्यपाल मलिक यांनी मणिपूर हिंसाचाराबद्दल ट्विट करत म्हटले की, "महिन्याला तासनतास मन की बात बोलणारे पंतप्रधान आज जळत्या मणिपूरवर केवळ ३६ सेकंद बोलले. असे का? बेटी बचाओ, बेटी पढाओचा नारा देणाऱ्या सरकारच्या काळात मुलींची खुलेआम धिंड काढली जात आहे. मणिपूरमध्ये महिलांवर झालेली घटना निंदनीय आहे."
घंटों घंटों तक मन की बात करने वाले प्रधानमंत्री जी आज़ जलते #मणिपुर पर मात्र 36 सैकेंड बोले। बेटी-बचाओ,बेटी-पढ़ाओ का नारा देने वाली सरकार के शासनकाल में सरेआम बेटियों को निर्वस्त्र घुमाया जा रहा है। मणिपुर में #महिलाओं पर हो रही #बर्बरता निंदनीय है- सत्यपाल मलिक (पूर्व गवर्नर) pic.twitter.com/1rDrhXHgG3
— Satyapal Malik 🇮🇳 (@SatyapalmalikG) July 20, 2023
यापूर्वी २० जुलै रोजी सत्यपाल मलिक यांनी मणिपूर हिंसाचार लाजिरवाणा असल्याचे म्हटले होते. या घटनेचा सोशल मीडियावर व्हायरल झालेला व्हिडीओ हृदय पिळवटून टाकणारा असल्याचे ते म्हणाले. मणिपूरच्या घटनेवर तीव्र नाराजी व्यक्त करताना ते म्हणाले की, ज्यांनी युक्रेन-रशिया युद्ध थांबवले ते आपल्याच देशात गेल्या ६० दिवसांपासून जळत असलेल्या मणिपूरला का वाचवत नाहीत. हे सरकार पुन्हा सत्तेवर आले तर संपूर्ण देशात अशीच दंगली घडवतील.
काय घडलं मणिपूरमध्ये?
मणिपूरमध्ये महिलांची विवस्त्र धिंड काढण्याचा जो भीषण प्रकार ४ मे रोजी कंगपोकपी जिल्ह्यातील गावामध्ये घडला, त्याची पोलिसांकडे दाखल झालेल्या एफआयआरमधील माहिती अंगावर काटा आणणारी आहे. अत्याधुनिक शस्त्रे घेतलेले ८०० ते १००० लोक बी फिनोम या गावामध्ये घुसले. या लोकांपासून जीव वाचविण्यासाठी गावकरी जंगलात आश्रयाला गेले. त्यापैकी पाच जणांना मैतेई संघटनांच्या कार्यकर्त्यांनी घेरले. त्यात ५६ वर्षे वयाची एक व्यक्ती, त्यांचा १९ वर्षांचा मुलगा, २१ वर्षे वयाची मुलगी तसेच ४२ वर्षे व ५२ वर्षे वयाच्या दोन महिलांचा समावेश होता. त्यातील ५६ वर्षांच्या व्यक्तीची मैतेई जमावाने हत्या केली. त्यानंतर तीन महिलांना सर्व लोकांसमोर विवस्त्र केले. त्यानंतर २१ वर्षे वयाच्या मुलीवर दिवसाढवळ्या सर्वांसमोर सामूहिक बलात्कार करण्यात आला. तसेच दोन महिलांचा विवस्त्रावस्थेतील व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता.