साडी नेसली तरच विश्वनाथाचे दर्शन
By Admin | Updated: November 23, 2015 23:54 IST2015-11-23T23:54:18+5:302015-11-23T23:54:18+5:30
काशी विश्वनाथ मंदिरात तोकड्या कपड्यांत येणाऱ्या विदेशी महिला पर्यटकांना प्रवेशबंदी करण्यात आली असून त्यांच्यासाठी नवा ड्रेस कोड लागू करण्यात आला आहे

साडी नेसली तरच विश्वनाथाचे दर्शन
लखनौ : काशी विश्वनाथ मंदिरात तोकड्या कपड्यांत येणाऱ्या विदेशी महिला पर्यटकांना प्रवेशबंदी करण्यात आली असून त्यांच्यासाठी नवा ड्रेस कोड लागू करण्यात आला आहे. त्यानुसार तोकड्या व पारदर्शक कपड्यांमधील विदेशी महिलांना यापुढे मंदिरात प्रवेश दिला जाणार नाही. मंदिरात प्रवेश करायचा असेल तर या विदेशी महिलांना आपल्या ड्रेसवर साडी गुंडाळावी लागेल.
विशेष म्हणजे, मंदिर प्रशासनाच्या वतीने विदेशी महिलांना साडी विकण्याची व नेसवून देण्याची सोय करण्यात आली आहे. यासाठी दोन प्रवेशद्वारावर महिला पोलीस कर्मचारी तैनात करण्यात येतील. या महिला पोलीस विदेशी महिलांना साडी नेसण्यास मदत करतील. काशी विश्वनाथ मंदिरात अनेक महिला तोकड्या व पारदर्शक कपड्यांमध्ये येतात. हे असभ्यपणाचे वाटते. अनेक स्थानिक भाविकांनी यावर आक्षेप घेत, या विदेशी महिलांसाठी ड्रेसकोड लागू करण्याची मागणी केली होती. त्यानुसार मंदिर प्रशासनाने हा निर्णय घेतला असल्याचे मंदिर व्यवस्थापनाने सांगितले. (वृत्तसंस्था)