Sanjay Raut News: दिल्लीच्या रस्त्यावर संसदेतील ३०० पेक्षा जास्त खासदारांनी लोकशाहीच्या रक्षणासाठी आंदोलन, संघर्ष केला. सध्याच्या निवडणूक आयोगाने टी.एन.शेषन यांचा अभ्यास करायला हवा, त्यांनी त्यांच्या कारकिर्दीत कशा प्रकारे काम केले? त्यांनी आदर्श आचारसंहितेच पालन कसे करायला लावले? याचा अभ्यास केला पाहिजे. गेल्या १० वर्षांपासून पाहतोय, निवडणूक आयोग हा भाजपाची एक शाखा झालेला आहे. राहुल गांधी यांनी जी लढाई सुरू केली आहे, त्यात आम्ही त्यांच्या सोबत आहोत. हे आंदोलन जयप्रकाश नारायण यांच्या आंदोलनापेक्षा मोठे होणार, असा दावा संजय राऊत यांनी केला.
पत्रकारांशी बोलताना संजय राऊत म्हणाले की, राहुल गांधी यांनी निवडणूक आयोगाच्या डेटावर संशोधन केले आहे. निवडणूक आयोगाच्या संकेतस्थळावरच सगळा गैरप्रकार आहे. तुम्ही संसदेला लोकशाहीचे सर्वोच्च मंदिर मानता, पण त्याच मंदिरात चोऱ्या-माऱ्या करून सत्तेवर आलेले लोक आमच्या अवतीभवती आहेत. त्या चोरांचे हस्तक म्हणून या देशाचं निवडणूक आयोग काम करते. ३०० खासदार जेव्हा रस्त्यावर उतरून निवडणूक आयोगाच्या दिशेने जात होते, तेव्हा त्यांना दिल्ली पोलिसांकडून अडवण्यात आले, धक्काबुक्की करण्यात आली, बॅरिकेड्स टाकण्यात आले. आम्ही अतिरेकी, दहशतवादी आहोत का?, असा सवाल संजय राऊतांनी करत टीका केली.
निवडणूक आयोगाला हृदयविकाराचा झटका आला असता का?
३०० खासदार निवडणूक आयोगसमोर जाऊन उभे राहिले असते आणि त्यांनी आपली भूमिका किंवा निवदेन मांडले असते तर निवडणूक आयोगाला हृदयविकाराचा झटका आला असता का? निवडणूक आयोग नेमके कोणाला घाबरत आहे? लोकशाहीचे रखवालदार म्हणून आम्ही निवडणूक आयोगाकडे पाहतो, त्यांनी निष्पक्ष निवडणुका घेतल्या पाहिजेत असे आम्ही मानतो. पण हा निवडणूक आयोग रखवालदार नसून तो चोर आहे. रखवालदार चोराच्या भूमिकेत शिरला आहे आणि चोरांच्या मदतीने विरोधी पक्षांना खतम करण्याचा प्रयत्न सुरू आहे, या शब्दांत संजय राऊत यांनी हल्लाबोल केला.
दरम्यान, नरेंद्र मोदी, अमित शहा हे काही अजरामर नाहीत, त्यांनाही कधीतरी या सत्तेवरून आणि जगातून जायचे आहेच, हे लक्षात घ्यावे. निवडणूक आयोगाच्या खुर्चीवर बसलेल्यांनी हे समजून घेतले पाहिजे. लोकशाही टिकली तर हा देश टिकेल. त्यांनी आम्हाला रस्त्यावर अटक केली, आम्हाला पोलीस स्टेशनमध्ये डिटेन करण्यात आले, अटकेची कागदपत्रे करायला उशीर झाला, त्यामुळे आम्ही संसदेत पोहोचू शकलो नाही. त्याच काळात त्यांनी सगळी बिले मंजूर करून घेतली. हे सरकार किती कारस्थान करत आहे. मोदी, शहा, फडणवीस हे सरळमार्गाने नव्हे तर लांड्यालबाड्या करून सत्तेवर आले आहेत, अशी टीका संजय राऊतांनी केली.