संघ ‘दक्ष’, राजकारण तप्त !
By Admin | Updated: May 12, 2014 02:13 IST2014-05-12T02:13:41+5:302014-05-12T02:13:41+5:30
लोकसभा निवडणुकांच्या निकालाला अवघे पाच दिवस शिल्लक राहिले असताना राष्ट्रीय स्वयंसेवक संघ दिल्लीतील राजकारणाबाबत कमालीचा ‘दक्ष’ झाल्यानंतर राजकीय पारा चढायला सुरुवात झाली आहे.

संघ ‘दक्ष’, राजकारण तप्त !
काँग्रेसची टीका : राजनाथ सिंह संघनेत्यांच्या भेटीस
नवी दिल्ली : लोकसभा निवडणुकांच्या निकालाला अवघे पाच दिवस शिल्लक राहिले असताना राष्ट्रीय स्वयंसेवक संघ दिल्लीतील राजकारणाबाबत कमालीचा ‘दक्ष’ झाल्यानंतर राजकीय पारा चढायला सुरुवात झाली आहे. विशेषत: संघ कार्यालयात फेर्या वाढलेल्या भाजपा नेत्यांनी निकालानंतरच्या भूमिकेसंदर्भात शेवटच्या टप्प्यातील मतदानापूर्वीच विचारमंथन सुरू केल्याचे संकेत मिळत आहेत. नरेंद्र मोदी यांच्यापाठोपाठ भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष राजनाथसिंह यांनीही संघाच्या कचेरीत हजेरी लावल्याने त्याला पुष्टी मिळत असतानाच संघ हाच भाजपाचा खरा रिमोट कंट्रोल असल्याची तोफ काँग्रेसने डागली आहे. राजनाथ व संघाच्या पदाधिकार्यांच्या ताज्या भेटीदरम्यान निकालासंदर्भात चर्चा झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. विशेष म्हणजे भाजपाचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदी यांनी शनिवारी रात्री संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट घेतली होती, तर रविवारी राजनाथ यांनी नवी दिल्लीतील झंडेवाला येथील संघाच्या कार्यालयात सहकार्यवाह भय्याजी जोशी व सुरेश सोनी यांच्याशी चर्चा केली, अशी माहिती सूत्रांनी दिली. संघाचे आभार मानण्यासाठी राजनाथ यांनी ही भेट घेतली. मात्र संघाने निकालानंतरच्या रणनीतीवर चर्चा केली नसल्याची माहिती सूत्रांनी दिली. (लोकमत न्यूज नेटवर्क) मोदींचा रिमोट संघाच्या हातात मोदी यांनी प्रचार संपल्यावर लगेच सरसंघचालकांची भेट घेतल्यानंतर काँगेसने जोरदार हल्लाबोल केला आहे. मोदी यांचा रिमोट कंट्रोल संघाच्या हाती असल्याची टीका काँग्रेसचे प्रवक्ते अभिषेक मनू सिंघवी यांनी केली आहे. ते म्हणाले, गुजरातचे मुख्यमंत्री नेहमी रिमोट कंट्रोलचे उदाहरण देतात. परंतु संघ पदाधिकार्यांची त्यांनी घेतलेली भेट सिद्ध करते की, त्यांचा रिमोट संघाच्याच हाती आहे.