पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय सैन्याने सुरू केलेल्या 'ऑपरेशन सिंदूर'वरकाँग्रेसने कार्यसमितीची आपत्कालीन बैठक बोलावली होती. या बैठकीमध्ये काँग्रेसचे सर्व प्रमुख नेते सहभागी झाले. या बैठकीनंतर काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे आणि लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी प्रतिक्रिया दिली. खरगे यांनी आम्ही दहशतवादाविरोधात सरकारसोबत असल्याचे सांगितले.
तणाव वाढवायचा नाही, पण...; अजित डोवाल यांची अमेरिका,ब्रिटन आणि सौदीसह अनेक देशांशी चर्चा!
मल्लिकार्जुन खरगे म्हणाले, 'ऑपरेशन सिंदूर अंतर्गत पाकिस्तान आणि पीओकेमधील दहशतवादी तळांवर धाडसी आणि निर्णायक कारवाई करून योग्य उत्तर देणाऱ्या भारतीय सैन्याचा आम्हाला अभिमान आहे. आमच्या शूर सैनिकांच्या धाडसाला, दृढनिश्चयाला आणि देशभक्तीला आम्ही सलाम करतो. दहशतवादी हल्ल्याच्या पहिल्या दिवसापासूनच काँग्रेसने लष्कर आणि सरकारसोबत एकता दाखवली आणि सीमापार दहशतवादाविरुद्धच्या प्रत्येक निर्णायक कारवाईला पाठिंबा दिला.
सैन्याला पूर्ण पाठिंबा आणि शुभेच्छा - राहुल गांधी
दरम्यान, लोकसभेतील विरोधी पक्षनेते खासदार राहुल गांधी म्हणाले, 'आम्ही कार्यकारिणीत यावर चर्चा केली. आमचा सैन्याला पूर्ण पाठिंबा, त्यांना शुभेच्छा. काँग्रेस पक्ष आणि काँग्रेस कार्यकारिणीचा पूर्ण पाठिंबा आहे. आम्हाला उद्या सर्वपक्षीय बैठकीसाठी बोलावण्यात आले आहे, असंही राहुल गांधी म्हणाले.
भारतीय लष्कराचे ऑपरेशन सिंदूर हे २२ एप्रिल रोजी जम्मू आणि काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा बदला होता. पहलगाम येथील हल्ल्यामध्ये २६ पर्यटकांची हत्या केली. दरम्यान काल रात्री कारवाईदरम्यान, भारतीय सैन्याच्या शूर सैनिकांनी पाकिस्तान आणि पीओकेमधील नऊ दहशतवादी तळांवर क्षेपणास्त्रांनी हल्ला केला.
२२ एप्रिल रोजी पहलगाममधील दहशतवाद्यांनी बैसरन खोऱ्यातील गवताळ प्रदेशात सुट्टीचा आनंद घेत असलेल्या २६ पर्यटकांची निर्घृण हत्या केली होती. त्यानंतर भारताने पाकिस्तानवर अनेक प्रकारचे निर्बंध लादले.