सभापतीपदी सलीम सय्यद यांची निवड परिवहन समिती : 12 पैकी 8 मतांनी विजयी
By admin | Updated: March 14, 2015 23:45 IST
सोलापूर : महापालिका परिवहन समितीच्या सभापतीपदासाठी शुक्रवारी झालेल्या निवडणुकीत 12 पैकी 8 मते मिळून काँग्रेसचे सलीम सय्यद उर्फ पामा हे विजयी झाले.
सभापतीपदी सलीम सय्यद यांची निवड परिवहन समिती : 12 पैकी 8 मतांनी विजयी
सोलापूर : महापालिका परिवहन समितीच्या सभापतीपदासाठी शुक्रवारी झालेल्या निवडणुकीत 12 पैकी 8 मते मिळून काँग्रेसचे सलीम सय्यद उर्फ पामा हे विजयी झाले.शुक्रवारी स्थायी समितीच्या सभागृहात पीठासन अधिकारी तथा जि. प.चे मुख्य कार्यकारी अधिकारी सुरेश काकाणी यांच्या अध्यक्षतेखाली निवडणूक प्रक्रिया राबविण्यात आली. यावेळी नगरसचिव ए. ए. पठाण, परिवहनचे प्रभारी व्यवस्थापक र्शीकांत मायकलवार आदी अधिकारी उपस्थित होते. सकाळी 11.30 वा निवडणूक प्रक्रियेला सुरुवात झाली. 13 पैकी 12 सदस्य यावेळी उपस्थित होते. मतदान प्रक्रियेला सुरुवात झाल्यानंतर सलीम सय्यद उर्फ पामा यांच्या बाजूने 8 सदस्यांनी हात उंचावून मतदान केले, तर भाजपचे उमेदवार मल्लिनाथ याळगी यांच्या बाजूने फक्त 4 सदस्यांनी हात उंचावून मतदान केले. बहुमत लक्षात घेऊन पीठासन अधिकारी सुरेश काकाणी यांनी सलीम सय्यद उर्फ पामा यांची निवड जाहीर केली. सभापतीच्या निवडणुकीदरम्यान मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे सदस्य महिबूब हिरापुरे यांनी अनुपस्थिती दाखवून बहिष्कार टाकला. निवडीनंतर मावळते परिवहन समिती सभापती आनंद मुस्तारे यांनी आपला पदभार सलीम सय्यद यांच्याकडे सोपविला. यावेळी स्थायी समितीचे सभापती पद्माकर काळे, माजी सभापती बाबा मिस्त्री यांच्यासह महापालिकेतील सदस्यांनी सय्यद यांचा सत्कार केला. निवड जाहीर होताच कार्यकर्त्यांनी महापालिका परिसरात फटाक्यांची आतिषबाजी करीत जल्लोष केला. (प्रतिनिधी) चौकट..परिवहनच्या सुधारणेवर भर देणार : सय्यदपरिवहन विभागात अनेक प्रश्न आहेत, त्यावर मात करण्यासाठी सर्वांना विश्वासात घेऊन काम करणार आहे. परिवहन समितीमध्ये ज्येष्ठ सदस्य आहेत, त्यांचे मार्गदर्शन मला उपयोगी पडणार आहे. भविष्यात परिवहनला ऊर्जितावस्था प्राप्त करून देण्यासाठी लवकरच बैठक बोलावून आढावा घेणार आहे. परिवहनचे उत्पन्न वाढण्यासाठी आणि प्रवाशांना अधिकाधिक चांगली सेवा देण्यासाठी आपले प्राधान्य राहील. पूर्ण वेळ व्यवस्थापक नेमून कारभार सुरळीत कसा चालेल आणि रखडलेल्या कर्मचार्यांची भरती कशा पद्धतीने करता येईल, याचा अभ्यास करणार असल्याचेही यावेळी नूतन परिवहन समिती सभापती सलीम सय्यद उर्फ पामा यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.