डॉक्टरांसाठी सुरक्षा मास्क तयार केला फक्त ५० रुपयांत!
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 9, 2020 05:39 IST2020-04-09T05:39:45+5:302020-04-09T05:39:54+5:30
हैदराबादमधील एल. व्ही. प्रसाद डोळ््यांच्या संस्थेने ही कामगिरी केली आहे.

डॉक्टरांसाठी सुरक्षा मास्क तयार केला फक्त ५० रुपयांत!
हैदराबाद : कोरोनाबाधित रुग्णांवर डॉक्टरांना सुरक्षितपणे उपचार करता यावा, यासाठी हैदराबादमधील संशोधन संस्थेने मास्क तयार केला आहे. त्याची किंमत अवघी पन्नास रुपये आहे. डॉक्टरांना सुरक्षा मिळण्याबरोबरच उपचारामध्येदेखील सुलभता येणार आहे.
हैदराबादमधील एल. व्ही. प्रसाद डोळ््यांच्या संस्थेने ही कामगिरी केली आहे. कोरोनाचा प्रसार वेगाने वाढत असल्याने वैयक्तिक सुरक्षा साधनांची मोठ्या प्रमाणावर गरज भासणार आहे. विशेषत: बाधितांवर उपचार करणारे डॉक्टर आणि वैद्यकीय कर्मचाऱ्यांना त्याची नितांत आवश्यकता आहे. पाकिस्तानमध्ये डॉक्टरांना सुरक्षा साधने नसल्याने त्यांनी आंदोलन केले होते. भारतातील विविध संशोधन संस्था आणि कंपन्या स्वयंमस्फूर्तीने कोरोना चाचणी किट आणि वैयक्तिक सुरक्षा साधने बनवत आहेत.
या बाबत बोलताना नेत्रतज्ज्ञ डॉ. अरविंद पटेल म्हणाले, डॉक्टर रुग्णांची तपासणी करीत असताना वैयक्तिक सुरक्षा मास्क वापरतात. मात्र, जर त्यांना पारदर्शी मास्क दिल्यास त्यांना ते अधिक सोयीचे होईल. तसेच, तोंडाला हात लागण्याची शक्यता त्यामुळे नाहीशी होईल. हा पारदर्शी मास्क संपूर्ण चेहºयाला सुरक्षा प्रदान करेल. केवळ चार तासामधे या छोटेखानी उपकरणाचा आराखडा करण्यात आला. त्यानंतर, अवघ्या ४८ तासांमधे त्याचे उत्पादन देखील करण्यात आले. त्याची किंमत ५० रुपये इतकी आहे. कोरोना विरोधातील लढाईमधे आघाडीवर लढणाºया डॉक्टरांना त्याचा उपयोग होईल.
हैदराबाद मधील फर्नांडीझ रुग्णालयाला ५०० आणि कामिनेनी हॉस्पिटल्सला दीड हजार मास्क देण्यात आले आहेत.