विरंगुळ्याच्या क्षणी जंगमांच्या तोंडून शिवकथा श्रवण करताना निरंजनीचे साधू-महंत
By Admin | Updated: September 10, 2015 16:46 IST2015-09-10T16:46:22+5:302015-09-10T16:46:22+5:30
त्र्यंबकेश्वर : ना शाहीस्नान मिरवणूक, ना कोणते धार्मिक कार्य. अशा निवांत विरंगुळ्याच्या क्षणी त्र्यंबकेश्वर येथे जंगम समाजाचे लोक साधू-महंतांना शिवकथा ऐकवित आहेत. विशेष म्हणजे, खूश होऊन साधू-महात्मा शंभरपासून पाचशे रुपयांपर्यंत दक्षिणा देत असतानाचे दृश्य पाहावयास मिळत आहे.

विरंगुळ्याच्या क्षणी जंगमांच्या तोंडून शिवकथा श्रवण करताना निरंजनीचे साधू-महंत
त र्यंबकेश्वर : ना शाहीस्नान मिरवणूक, ना कोणते धार्मिक कार्य. अशा निवांत विरंगुळ्याच्या क्षणी त्र्यंबकेश्वर येथे जंगम समाजाचे लोक साधू-महंतांना शिवकथा ऐकवित आहेत. विशेष म्हणजे, खूश होऊन साधू-महात्मा शंभरपासून पाचशे रुपयांपर्यंत दक्षिणा देत असतानाचे दृश्य पाहावयास मिळत आहे.सध्या त्र्यंबकेश्वर येथे सिंहस्थविषयक वातावरण आहे. जिकडे पाहावे तिकडे सत्संग व नामांकित प्रवचनकारांची प्रवचने सुरू आहेत. भंडारा-भोजनाची रेलचेल सुरू आहे. अशा वेळी जंगम लोक शिवकथा सांगून आखाड्यांकडून मिळेल ती बिदागी व भोजनाचा लाभ घेत असतात. हे जंगम त्र्यंबकमधील दहा आखाडे, मठ, आश्रम, साधुग्राम आदि ठिकाणी दिवसभर भटकत असतात. यासंदर्भात अखिल भारतीय आखाडा परिषदेचे अध्यक्ष महंत नरेंद्रगिरीजी महाराज यांना विचारले असता ते म्हणाले, त्यांची म्हणायची ढब, म्हणताना होणारे हावभाव पाहण्यासारखे असतात. शिवपार्वती विवाहसमयी दान कोणीच घेईना. अशा वेळी भगवान शंकराला मोठा पेच पडला. दान तर दिलेच पाहिजे. शेवटी भगवान शंकराने आपल्या जांधेवर (मांडीवर) फटका मारला आणि या जंगमांची उत्पत्ती होऊन त्यांनी दान घेतले आणि तेव्हापासून जंगम शिवकथा ऐकवून दान मागतात. विशेष म्हणजे, हे लोक संन्यासींकडूनच दान घेत असतात. हे लोक प्रापंचिक असतात. डोक्यावर विशिष्ट आकाराचा फेटा बांधून दोन्ही कानांवर व डोक्यावर झांजा बसविलेल्या असतात. डोक्याच्या मध्यभागावर एक मोठा तुरा असतो आणि हा तुरा म्हणजे या समाजाची ओळख असते. गीतातून सांगितलेल्या त्यांच्या कथा साधू-महंतांना डोलायला लावतात. (वार्ताहर)---