अशोक गेहलोत यांच्यावरच सचिन पायलट नाराज

By ऑनलाइन लोकमत | Published: July 15, 2020 01:27 AM2020-07-15T01:27:26+5:302020-07-15T01:28:08+5:30

पायलट हे सोमवारच्या विधीमंडळ बैठकीपासून दूर राहिले होते. काँग्रेसचे १८ आमदारही या बैठकीपासून दूर राहिले. तत्पूर्वी, आपल्या पाठीशी काँग्रेसचे ३० आमदार व काही अपक्ष आमदार आहेत, असा दावा पायलट यांनी केला होता.

Sachin Pilot is angry with Ashok Gehlot | अशोक गेहलोत यांच्यावरच सचिन पायलट नाराज

अशोक गेहलोत यांच्यावरच सचिन पायलट नाराज

Next

जयपूर/नवी दिल्ली : २०१८ मधील विधानसभा निवडणुकीनंतर काँग्रेसने अशोक गेहलोत यांना मुख्यमंत्रीपद दिल्यापासून सचिन पायलट नाराज होते. पण मध्यप्रदेशात ज्योदिरादित्य सिंदिया यांच्या बंडानंतर पायलट यांनी समर्थक आमदारांसह भाजपशी संपर्क सुरू केला. ते पुरेसे आमदार घेऊन आल्यास भाजप नेते त्यांना मुख्यमंत्री करण्यास तयार होते, अशी चर्चा सुरूच होती. विधानसभेतील विजय पायलट यांच्या प्रदेशाध्यक्षपदाच्या कार्यकाळात मिळाल्याने त्यांचा या पदावर दावा आहे, असे समर्थकांचे म्हणणे होते.
पायलट हे सोमवारच्या विधीमंडळ बैठकीपासून दूर राहिले होते. काँग्रेसचे १८ आमदारही या बैठकीपासून दूर राहिले. तत्पूर्वी, आपल्या पाठीशी काँग्रेसचे ३० आमदार व काही अपक्ष आमदार आहेत, असा दावा पायलट यांनी केला होता. मात्र, २०० सदस्यांच्या विधानसभेत काँग्रेसच्या १०७ पैकी बहुतांश व काही अपक्षांनी गेहलोत सरकारवर विश्वास व्यक्त केला. त्यानंतर पायलट यांनी गेहलोत यांना बहुमत सिद्ध करण्याचे आव्हान दिले.
मंगळवारी काँग्रेसच्या विधिमंडळ पक्षाची बैठक संपल्यानंतर काँग्रेसचे प्रवक्ते रणदीप सुरजेवाला यांनी पायलट व दोन जणांना मंत्रीपदावरून बरखास्त केल्याची घोषणा केली.
पक्षाचे ओबीसी नेते गोविंदसिंग डोटासरा हे राजस्थानचे नवे प्रदेशाध्यक्ष असतील. त्याचबरोबर आदिवासी नेते व आ. गणेश घोगरा यांची युवा काँग्रेस प्रदेशाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली.

गेहलोत यांनी घेतली राज्यपालांची भेट
विधिमंडळ बैठकीनंतर मुख्यमंत्री गेहलोत यांनी राज्यपाल कलराज मिश्रा यांची भेट घेतली व तीन जणांना मंत्रिमंडळातून काढण्याची शिफारस केली. दरम्यान, राज्यातील राजकीय उलथापालथीच्या पार्श्वभूमीवर पोलिसांना सतर्कतेचे आदेश देण्यात आले होते.

बहुमत सिद्ध करा, भाजपची मागणी
भाजपने गेहलोत सरकारच्या बहुमताच्या चाचणीची मागणी केली आहे. आमदारांच्या घरांवर पाळत ठेवली जात आहे व बीटीपीच्या आमदारांना धमकावले जात आहे, असा आरोपही पक्षाने केला आहे. विरोधी पक्षनेते गुलाबचंद कटारिया यांनी म्हटले आहे की, सरकारने आधी बहुमत सिद्ध करावे व नंतर मंत्रिमंडळाचा फेरबदल करावा.

हकालपट्टी दुर्दैवी, काँग्रेस नेत्यांची प्रतिक्रिया
सचिन पायलट यांची दोन्ही पदांवरून हकालपट्टी करण्याचा निर्णय दुर्दैर्वी व दु:खदायक आहे, अशी प्रतिक्रिया काँग्रेस नेत्यांनी दिली. पक्षाचे प्रवक्ते अभिषेक सिंघवी यांनी म्हटले आहे की, खुल्या दरवाजांचा वापर केला जात नसेल तर काही दरवाजे बंद केलेच पाहिजेत. आम्हाला अजूनही आशा आहे.

Web Title: Sachin Pilot is angry with Ashok Gehlot

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.