'माझ्या अमेरिका दौऱ्याबाबत राहुल गांधी खोटं बोलले', परराष्ट्र मंत्री जयशंकर यांचा पलटवार

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 3, 2025 18:22 IST2025-02-03T18:22:24+5:302025-02-03T18:22:48+5:30

S Jaishankar on Rahul Gandhi : राहुल गांधी भारताची प्रतिमा मलीन करण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप जयशंकर यांनी केला.

S Jaishankar on Rahul Gandhi: 'Rahul Gandhi lied about my US visit', Foreign Minister Jaishankar's counterattack | 'माझ्या अमेरिका दौऱ्याबाबत राहुल गांधी खोटं बोलले', परराष्ट्र मंत्री जयशंकर यांचा पलटवार

'माझ्या अमेरिका दौऱ्याबाबत राहुल गांधी खोटं बोलले', परराष्ट्र मंत्री जयशंकर यांचा पलटवार

S Jaishankar on Rahul Gandhi : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या शपथविधी सोहळ्याचे निमंत्रण मिळावे, यासाठी परराष्ट्र मंत्री जयशंकर यांना अमेरिकेला पाठवण्यात आले होते, असा आरोप राहुल गांधींनी आज संसदेत बोलताना केला. या आरोपांवर आता स्वतः जयशंकर यांनी प्रतिक्रिया दिली आहे. 'यूएस दौऱ्यात पंतप्रधान मोदींच्या निमंत्रणावर कधीही चर्चा झाली नाही. राहुल गांधी भारताची प्रतिमा मलीन करण्याचा प्रयत्न करत आहेत,' असा पलटवार जयशंकर यांनी केला. 

राहुल गांधींवर निशाणा साधत परराष्ट्र मंत्र्यांनी एक्स पोस्टमध्ये लिहिले की, 'विरोधी पक्षनेते राहुल गांधी माझ्या डिसेंबर 2024 मधील अमेरिका दौऱ्याबाबत जाणूनबुजून खोटे बोलले. मी बायडेन प्रशासनाच्या परराष्ट्र सचिव आणि NSA यांना भेटायला गेलो होतो. आमच्या कॉन्सुल जनरलच्या बैठकीच्या अध्यक्षतेसाठीही गेलो होतो. पंतप्रधानांच्या निमंत्रणाबाबत चर्चा झाली नाही. आपले पंतप्रधान अशा कार्यक्रमांना सहसा उपस्थित राहत नाहीत, हे सर्वज्ञात आहे. राहुल गांधी राजकीय हेतू साध्य करण्यासाठी देशाची प्रतिमा मलीन करत आहेत,' असा आरोप जयशंकर यांनी केला.

नेमकं काय म्हणाले राहुल गांधी?
संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात तिसऱ्या दिवशी राष्ट्रपतींच्या अभिभाषणावर चर्चा झाली. यावेळी विरोधी पक्षनेते राहुल गांधींनी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या शपथविधीवरुन पंतप्रधान नरेंद्र मोदींवर निशाणा साधला.  आपल्या देशात चांगली उत्पादन व्यवस्था असती तर परराष्ट्रमंत्र्यांना इतक्या वेळा अमेरिकेला जावे लागले नसते आणि आपल्या पंतप्रधानांना डोनाल्ड ट्रम्प यांच्या शपथविधीला बोलवण्यासाठी विनंती करावी लागली नसती. परराष्ट्र मंत्र्यांना अमेरिकेत जाऊन प्लीज आमच्या पंतप्रधानांना बोलवा, असे म्हणायला लागले नसते, असे विधान राहुल गांधी यांनी केले. राहुल गांधी टीका करत असताना पंतप्रधान मोदीही लोकसभेत उपस्थित होते.

राहुल गांधी यांनी केलेल्या आरोपांवर भाजप खासदारांनी लोकसभेत गदारोळ घातला. केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू यांनी लोकसभेचे विरोधी पक्षनेते असे निराधार आरोप करू शकत नाहीत, असे म्हटले. विरोधी पक्षाचे नेते अशी गंभीर आणि तथ्यहीन विधाने करू शकत नाहीत. हा दोन देशांमधील संबंधांशी निगडित मुद्दा आहे आणि राहुल गांधी आमच्या पंतप्रधानांच्या निमंत्रणाबाबत पुष्टी नसलेली विधाने करत आहेत, असे किरेन रिजिजू म्हणाले.

 

Web Title: S Jaishankar on Rahul Gandhi: 'Rahul Gandhi lied about my US visit', Foreign Minister Jaishankar's counterattack

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.