जम्मू-काश्मीरमधील पहलगाम येथे दहशतवादी हल्ला झाला. या हल्ल्यात २६ पर्यटकांचा मृत्यू झाला. या हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तान या दोन्ही देशात तणाव वाढला आहे. दरम्यान, आता जगभरातील अनेक देशांचा भारताला पाठिंबा मिळत आहे. आज रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी पंतप्रधान मोदींशी फोनवरून चर्चा केली आहे. यावेळी त्यांनी पहलगाममधील हल्ल्याचा निषेध केला. भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाने ही माहिती दिली आहे. परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जयस्वाल यांनी ट्विटरवर याबाबत पोस्ट शेअर केली आहे.
पहलगाम हल्ल्यानंतर भारताला मिळाली जपानची साथ; संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी मानले आभार
राष्ट्रपती पुतिन यांनी पंतप्रधान मोदींना फोन करून भारतातील पहलगाम येथील दहशतवादी हल्ल्याचा तीव्र निषेध केला. त्यांनी निष्पाप लोकांच्या मृत्युबद्दल तीव्र शोक व्यक्त केला आणि दहशतवादाविरुद्धच्या लढाईत भारताला पूर्ण पाठिंबा देण्याचे आश्वासन दिले.
रणधीर जयस्वाल म्हणाले, पुतिन यांनी या भयानक हल्ल्यातील गुन्हेगारांना आणि त्यांच्या समर्थकांना न्यायाच्या चौकटीत आणले पाहिजे यावर भर दिला. पंतप्रधानांनी राष्ट्रपती पुतिन यांना विजय दिनाच्या ८० व्या वर्धापन दिनानिमित्त शुभेच्छा दिल्या आणि या वर्षाच्या अखेरीस भारतात होणाऱ्या वार्षिक शिखर परिषदेला आमंत्रित केले.
भारताला मिळाली जपानची साथ
भारताचे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह आणि जपानचे संरक्षण मंत्री नाकातानी यांच्यात आज एक मोठी बैठक झाली. या बैठकीत पहलगाम दहशतवादी हल्ला, भारत आणि पाकिस्तानमधील वाढता तणाव आणि दक्षिण चीन समुद्रात चीनच्या वाढत्या लष्करी हालचालींबाबत चर्चा झाली. याशिवाय, दोन्ही देशांनी प्रादेशिक आणि आंतरराष्ट्रीय सुरक्षा परिस्थिती आणि द्विपक्षीय संरक्षण सहकार्य आणखी वाढवण्यावरही भर देण्यात आला. महत्वाचे म्हणजे, गेल्या 6 महिन्यांत दोन्ही देशांच्या संरक्षण मंत्र्यांची ही दुसरी बैठक आहे.
जपान सरकारचे मानले आभार
भारत-जपान संरक्षण मंत्र्यांच्या बैठकीत राजनाथ सिंह म्हणाले की, पहलगाम दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर भारतासोबत मजबूत एकता दाखवल्याबद्दल मी जपान सरकारचे आभार मानू इच्छितो.