ठरलं! RSS सरसंघचालक मोहन भागवत मणिपूरला जाणार; जातीय हिंसाचारानंतर प्रथमच ३ दिवसीय दौरा
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 19, 2025 16:20 IST2025-11-19T16:19:05+5:302025-11-19T16:20:11+5:30
RSS Chief Mohan Bhagwat Manipur Visit: RSS चे सरसंघचालक मोहन भागवत यांचा मणिपूर दौरा कसा असेल, याबाबत सविस्तर माहिती देण्यात आली आहे.

ठरलं! RSS सरसंघचालक मोहन भागवत मणिपूरला जाणार; जातीय हिंसाचारानंतर प्रथमच ३ दिवसीय दौरा
RSS Chief Mohan Bhagwat Manipur Visit: राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत तीन दिवसीय मणिपूर दौऱ्यावर जात आहे. मणिपूर येथे दोन वर्षांपूर्वी घडलेल्या जातीय हिंसाचारानंतर प्रथमच मोहन भागवत यांचा हा दौरा नियोजित करण्यात आला आहे. याबाबत संघाच्या पदाधिकाऱ्यांनी माहिती दिली. २० नोव्हेंबर ते २२ नोव्हेंबर असे तीन दिवस मोहन भागवत मणिपूरमध्ये असणार आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, मोहन भागवत यांचा हा दौरा राष्ट्रीय स्वयंसेवक संघ म्हणजेच RSS च्या शताब्दी सोहळ्याशी निगडीत आहे. मोहन भागवत २० नोव्हेंबर रोजी गुवाहाटीहून मणिपूरला जाणार आहेत. २२ नोव्हेंबर रोजी ते मणिपूर येथून प्रस्थान करतील. राज्यात हिंसाचार सुरू झाल्यापासून मणिपूरला हा त्यांचा पहिलाच दौरा असल्याचे संघाचे पदाधिकारी तरुणकुमार शर्मा यांनी सांगितले. यापूर्वी मोहन भागवत यांनी २०२२ मध्ये मणिपूरला भेट दिली होती.
मणिपूर दौऱ्यात मोहन भागवत कुणाला भेटणार?
या दौऱ्यादरम्यान मोहन भागवत विविध गटांशी संवाद साधतील. आरएसएस प्रमुखांच्या कार्यक्रमात काही नागरिक, स्थानिक आदिवासी समुदायाचे प्रतिनिधी आणि युवा नेते यांचा समावेश असेल. तरुण कुमार शर्मा म्हणाले की, ज्या दिवशी मोहन भागवत मणिपूरला पोहोचतील त्या दिवशी ते इंफाळमधील कोंजेंग लीकाई येथे एका कार्यक्रमात उद्योजक आणि प्रमुख लोकांना भेटतील. यानंतर, २१ नोव्हेंबर रोजी मोहन भागवत मणिपूरच्या आदिवासी समाजाच्या नेत्यांना भेटतील आणि त्यांच्याशी संवाद साधतील.
विस्थापितांच्या मदत छावण्यांना मोहन भागवत भेट देणार का?
गेल्या दोन वर्षांपासून विस्थापित लोक राहत असलेल्या मदत छावण्यांनाही संघ प्रमुख भेट देतील का असे विचारले असता, संघाचे राज्य सरचिटणीस तरुण कुमार शर्मा म्हणाले की, अद्याप अशी कोणतीही योजना नाही. हा दौरा प्रामुख्याने संघटनेचा अंतर्गत कार्यक्रम आहे. २०२३ पासून मणिपूरमध्ये मेतेई आणि कुकी समुदायांमधील हिंसाचारात २६० हून अधिक लोक मृत्युमुखी पडले आहेत आणि हजारो बेघर झाले आहेत.
दरम्यान, भारताला हिंदू राष्ट्र घोषित करण्याची गरज नाही. ज्या व्यक्तीला भारताचा अभिमान वाटतो, ती प्रत्येक व्यक्ती हिंदूच आहे. हिंदू धर्माची ओळख केवळ धार्मिक नसून ती एक सभ्यतेची ओळख आहे. भारत आणि हिंदू एकच आहेत. भारत मूळतः 'हिंदू राष्ट्र'च आहे. त्यामुळे भारताला 'हिंदू राष्ट्र' होण्यासाठी कोणत्याही अधिकृत घोषणेची आवश्यकता नाही, असे स्पष्ट मत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी मांडले. गुवाहाटी येथे एका सभेला संबोधित करताना ते बोलत होते.