दिल्लीत RSS सरसंघचालक मोहन भागवत यांची मुस्लीम धर्मगुरू, इमाम यांच्यासोबत महत्त्वाची बैठक
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 24, 2025 11:14 IST2025-07-24T11:14:15+5:302025-07-24T11:14:42+5:30
याआधी सप्टेंबर २०२२ मध्येही मोहन भागवत यांनी मुस्लीम समाजातील लोकांसोबत चर्चा केली होती.

दिल्लीत RSS सरसंघचालक मोहन भागवत यांची मुस्लीम धर्मगुरू, इमाम यांच्यासोबत महत्त्वाची बैठक
नवी दिल्ली - राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत दिल्लीतील हरियाणा भवन येथे एक बैठक घेत आहेत. या बैठकीबाबत राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. कारण ही बैठक मुस्लीम धर्मातील नेत्यांसोबत होत आहे. या बैठकीला ऑल इंडिया इमाम संघटनेचे प्रमुख उमर अहमद इलियासीसह मुस्लीमांचे अनेक धर्मगुरू सहभागी होणार आहेत. त्याशिवाय संघाचे ज्येष्ठ नेते दत्तात्रय होसाबळे, कृष्ण गोपाळ, रामलाल आणि इंद्रेश कुमारही बैठकीत हजर असणार आहेत.
एका रिपोर्टनुसार, ही बैठक संघाच्या मुस्लीम समाजापासून संवाद वाढवण्याच्या प्रयत्नांचा एक भाग मानली जाते. आरएसएसशी निगडीत मुस्लीम राष्ट्रीय मंचाकडून सातत्याने मुस्लिम समाजातील अभ्यासक, धर्मगुरू आणि इतर प्रतिष्ठित चेहऱ्यांसोबत संवाद वाढवला जात आहे. २०२३ मध्ये या मंचाकडून एक राष्ट्र, एक ध्वज, एक राष्ट्रगीत या भावनेतून अल्पसंख्याक समुदायाशी संवाद साधण्यासाठी राष्ट्रव्यापी अभियान सुरू करण्याची घोषणा केली होती. याआधी सप्टेंबर २०२२ मध्येही मोहन भागवत यांनी मुस्लीम समाजातील लोकांसोबत चर्चा केली होती.
ऑक्टोबर २०२२ मध्ये संघाचे नेते इंद्रेश कुमार यांनी दिल्लीतील हजरत निजामुद्दीन दर्ग्याला भेट दिली होती. तिथे दर्गा परिसरात दिवे पेटवण्यात आले होते. त्यावेळी ते म्हणाले होते की, कुणीही जबरदस्तीने धर्म परिवर्तन अथवा हिंसाचार करू नये. सर्वांना आपापल्या धर्माचे पालन करण्याचे स्वातंत्र्य आहे आणि सर्वांनी धर्मांचा सन्मान ठेवणे गरजेचे आहे असं त्यांनी सांगितले होते. इतकेच नाही तर सप्टेंबर २०२२ मध्ये मोहन भागवत यांनीही ऑल इंडिया इमाम संघटनेचे प्रमुख उमर अहमद इलियासी यांची भेट घेतली होती. त्याचवेळी एका मशिदीचा आणि मदरशाचा दौरा त्यांनी केला होता. या सर्व प्रयत्नांना धार्मिक सुसंवादासाठी उचललेले पाऊल मानले जात होते.
#WATCH | RSS Chief Mohan Bhagwat arrives at Haryana Bhawan in Delhi. pic.twitter.com/dmAFVaVfA3
— ANI (@ANI) July 24, 2025
दरम्यान, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ त्यांच्या स्थापनेचा शताब्दी वर्ष साजरे करत आहे. ज्या अंतर्गत ते भारतातील प्रत्येक गावात, शहरात, घराघरात पोहचण्याचा प्रयत्न करत आहेत. आज दिल्लीतील हरियाणा भवन इथं संघाचे सरसंघचालक मोहन भागवत मुस्लीम धर्मगुरूंसोबत बैठक घेत आहेत. विविध समुदायांमध्ये संवाद वाढवणे आणि सामाजिक एकता मजबूत करणे हा त्यामागचा उद्देश आहे. शताब्दी वर्षात देशातील प्रत्येक भागात आपली विचारधारा आणि सेवा कार्य पसरवण्याचा प्रयत्न संघ करत आहे. ही बैठक याच दृष्टीने महत्त्वाची मानली जाते जिथे विविध धर्मातील लोकांसोबत सुसंवाद साधण्याचा, सहकार्य करण्याचा भाग आहे.