दोन मुलं जन्माला घालण्याच्या वक्तव्यावरून मोहन भागवतांचा यू-टर्न
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 19, 2020 15:57 IST2020-01-19T15:49:45+5:302020-01-19T15:57:22+5:30
सरकारने देशात लोकसंख्याबाबतीत एक धोरण तयार केले पाहिजे आणि मग ते अंमलात आणले पाहिजे असे भागवत म्हणाले.

दोन मुलं जन्माला घालण्याच्या वक्तव्यावरून मोहन भागवतांचा यू-टर्न
नवी दिल्ली : उत्तर प्रदेशातील मुरादाबादमध्ये संघाच्या वतीने एका कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी कार्यकर्त्यांशी संवाद साधताना देशात दोनच मुलं जन्माला घालण्यासंबंधीचा कायदा असणं गरजेचं असल्याचं मत सरसंघचालक मोहन भागवत यांनी व्यक्त केले होते. मात्र, या वक्तव्यावरून मोहन भागवत यांनी आज यू-टर्न घेतला आहे.
मोहन भागवत म्हणाले की, दोन मुल जन्माला घालण्याच्या कायद्याबद्दल मी बोललो नाही. मी म्हणालो की वाढती लोकसंख्या एक समस्या असून त्याचबरोबर एक चांगला स्त्रोत देखील आहे. मात्र यासाठी सरकारने देशात लोकसंख्याबाबतीत एक धोरण तयार केले पाहिजे आणि मग ते अंमलात आणले पाहिजे असे भागवत म्हणाले. तर माझ्या बाबतीत माध्यमांमध्ये आलेल्या बातम्या खोट्या असल्याचे म्हणत, त्यांनी दोन मुलं जन्माला घालण्याच्या वक्तव्यावरून यू-टर्न घेतला.
यावेळी त्यांनी विरोधकांवर सुद्धा निशाणा साधला. काही लोकांनी आमची अशी काही प्रतिमा तयार केली आहे की, यांचा पुढचा अजेंडा लोकसंख्या कायद्याबद्दल असणार आहे. तर अनकेदा असे प्रसंग आले की, विरोधकांना वाटत होते संघ संपणार आहे, मात्र असे सांगणारे स्वता:चं संपले असल्याचे भागवत यावेळी म्हणाले. आम्हाला कुणाला पराभूत करायचं नसून आमचे कुणीही शत्रू नाही. सर्व लोक आपलेच असल्याचे सुद्धा भागवत म्हणाले.