‘मनस्ताप दिल्याप्रकरणी शास्त्रज्ञ नारायणन यांना ५० लाखांची भरपाई’
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 14, 2018 23:37 IST2018-09-14T23:37:31+5:302018-09-14T23:37:47+5:30
विनाकारण अटक करून मनस्ताप दिल्याबद्दल सर्वोच्च न्यायालयाने केरळ पोलिसांना फटकारले

‘मनस्ताप दिल्याप्रकरणी शास्त्रज्ञ नारायणन यांना ५० लाखांची भरपाई’
नवी दिल्ली : इस्रोमधील १९९४ च्या हेरगिरी प्रकरणात शास्त्रज्ञ नंबी नारायणन यांना विनाकारण अटक करून मनस्ताप दिल्याबद्दल सर्वोच्च न्यायालयाने केरळ पोलिसांना शुक्रवारी फटकारले. तसेच नारायणन यांना ५० लाखांची भरपाई ८ आठवड्यांच्या आत द्यावी, असा आदेश कोर्टाने केरळ सरकारला दिला.
इस्रोचे माजी शास्त्रज्ञ नंबी नारायणन (७६ ) यांना हेरगिरीच्या प्रकरणात कसे गोवण्यात आले याची चौकशी करण्यासाठी माजी न्यायाधीश डी.के. जैन यांच्या नेतृत्वाखाली त्रिसदस्यीय समिती न्यायालयाने नेमली. सरन्यायाधीश दीपक मिस्रा, न्या. अजय खानविलकर आदींचा समावेश असलेल्या खंडपीठाने हा निकाल दिला.
असा दिला न्यायालयीन लढा
भारताच्या अंतराळ संशोधन कार्यक्रमासंदर्भातील गोपनीय माहिती दोन शास्त्रज्ञ व अन्य चार व्यक्तींनी परकीयांच्या स्वाधीन केल्याच्या बातम्या १९९४ साली प्रसिद्ध झाल्या होत्या. त्यात नंबी नारायणन यांचेही नाव नमूद करण्यात आले होते. केरळ पोलिसांनी या प्रकरणाचा तपास केल्यानंतर ते सीबीआयकडे सोपविण्यात आले होते. मात्र, त्यांनी हेरगिरी केल्याचा कोणताही पुरावा सीबीआयला सापडला नव्हता. त्यानंतर नंबी नारायणन यांनी मानवी हक्क आयोग ते न्यायालयापर्यंत धाव घेतली.