रोहतकमधील 'त्या' बहीणींचा शूरपणा खोटा?
By Admin | Updated: December 3, 2014 17:51 IST2014-12-03T16:50:25+5:302014-12-03T17:51:19+5:30
हरयाणाच्या रोहतकमध्ये बसमध्ये छेडछाड करणा-या तरूणांना धडा शिकवणा-या दोन बहिणींच्या शूरपणावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

रोहतकमधील 'त्या' बहीणींचा शूरपणा खोटा?
ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. ३ - हरयाणाच्या रोहतकमध्ये बसमध्ये छेडछाड करणा-या तरुणांना धडा शिकवणा-या दोन बहीणींचा व्हिडिओ जगासमोर आल्यानंतर त्यांच्या शूरपणाचे कौतूक देशभर करण्यात आले. परंतू आता हा शूरपणाच खरा होता का? याविषयी संशयाचे धुके निर्माण झाले आहे.
बसमध्ये आपली छेडछाड काढली म्हणून आपण त्या मुलाला मारहाण केली असे सांगणा-या बहीणींची स्टोरी जरा वेगळेच वळण घेताना दिसत आहे. बसमधील काही साक्षिदारांच्या म्हणण्याप्रमाणे हा वाद छेडछाडीवरून झाला नसून तो बसमधील जागेवरून झाला होता अशी माहिती समोर आल्याने त्या बहिणींच्या शूरपणावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. दरम्यान, याच दोन बहिणींचा याआधीचा असाच एक दुसरा व्हिडिओ प्रसिध्द झाला असून यामध्ये त्या एका तरूणाची धुलाई करताना दिसत आहे. हा व्हिडिओ एक-दीड महिन्यापूर्वीचा असून यामध्ये नेमके कारण समोर येत नाही. हा व्हिडिओ कोणी काढला आम्हाला माहित नाही परंतू आम्ही त्यांच्याविरूध्द तक्रार दाखल करणार असल्याची माहिती त्या मुलींनी दिली आहे. रोहतकमधील घटनेत अटक झालेल्या तीन तरुणांपैकी दोघे लष्कराच्या भरतीच्या दोन परीक्षा उत्तीर्ण झाले होते. हरियाणामध्ये काही दिवसांपूर्वी झालेल्या लष्करभरतीमध्ये त्यांनी भाग घेतला होता. आता त्यांची लेखी परीक्षा होणे बाकी होते. मात्र, या घटनेनंतर त्यांना लष्करात दाखल होता येणार नाही, असे संरक्षणमंत्री मनोहर पर्रीकर यांनी स्पष्ट केले होते. परंतू आता मुलींच्या शूरपणावरच प्रश्नचिन्ह निर्माण झाल्याने या घटनेला विशेष महत्व प्राप्त झाले आहे. हरयाणा सरकार या दोन बहीणींचा २६ जानेवारी रोजी विशेष सत्कार करणार असल्याची घोषणा मुख्यमंत्र्यांनी याआधीच केली आहे.